आत्मरूप गणेशु केलिया स्मरण। सकळ विद्यांचें अधिकरण।
तेचि वंदूं श्रीचरण। श्रीगुरूंचे॥
सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरूंचे चरण होत. त्यांना नमस्कार करू.
जयांचेनि आठवें। शब्दसृष्टि आंगवे।
सारस्वत आघवें। जिव्हेसि ये॥
ज्या श्रीगुरूंच्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते व सकल विद्या जिव्हेवर येतात.
वक्तृत्वा गोडपणें। अमृतातें पारुखें म्हणे।
रस होती वोळंगणें। अक्शरांसी॥
वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात.
भावाचें अवतरण। अवतरविती खूण।
हाता चढे संपूर्ण। तत्त्वभेद॥
आता निरनिराळ्या तत्त्वातील फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खूण असते ती सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन होते.
श्रीगुरूंचे पाय। जैं हृदय गिंवसूनि ठाय।
तैं येवढें भाग्य होय। उन्मेखासी॥
तसेच जेव्हा हृदय श्रीगुरूंचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते.
ते नमस्कारूनि आतां। जो पितामहाचा पिता।
लक्ष्मीयेचा भर्ता। ऐसें म्हणे॥
आता त्या श्रीगुरूंच्या चरणांना नमस्कार करून तो ब्रह्मदेवाचा बाप व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला.
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः॥
श्रीकृष्ण आता म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला ‘क्षेत्र’ असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला ‘क्षेत्रज्ञ’ असे क्षेत्रक्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात.
तरी पार्था परिसिजे। देह हें क्षेत्र म्हणिजे।
जो हें जाणे तो बोलिजे। क्षेत्रज्ञु एथें॥
अर्जुना अजून ऐक, या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे.
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम॥
हे भरतकुलोत्पन्ना, सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ, तो मी आहे असे तू जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे स्वतःचे मत आहे.