अगा वृक्षासि पाताळीं। जळ सांपडे मुळीं।
तें शाखांचिये बाहाळीं। बाहेर दिसे॥
अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडते. तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते.
कां भूमीचें मार्दव। सांगे कोंभाची लवलव।
नाना आचारगौरव। सुकुलीनाचें॥
अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो.
अथवा संभ्रमाचिया आयती। स्नेहो जैसा ये व्यक्तिइ।
कां दर्शनाचिये प्रशस्तीं। पुण्यपुरुष॥
अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो किंवा दर्शनाने होणार्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो.
नातरी केळीं कापूर जाहला। जेवीं परिमळें जाणों आला।
कां भिंगारीं दीपु ठेविला। बाहेरी फांके॥
अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो.
तैसें हृदयींचेनि ज्ञानें। जियें देहीं उमटती चिन्हें।
तियें सांगों आतां अवधानें। चागें आइक॥
त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक.
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः॥
अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्वसहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा, (आंतर व बाह्य) शुद्धी, स्थैर्य, अंत:करणनिग्रह.
तरी कवणेही विषयींचें। साम्य होणें न रुचे।
संभावितपणाचें। वोझे जया॥
तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी न करणे ज्याला आवडत नाही व मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते.
आथिलेचि गुण वानितां। मान्यपणें मानितां।
योग्यतेचें येतां। रूप आंगा॥
त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे वर्णन केले तर व तो खरोखर मानास योग्य आहे म्हणून त्यास मान देऊ लागले तर अथवा लोकांनी मागण्याजोगी पात्रता आपल्या अंगी आली आहे अशी त्या पात्रतेची प्रगटता झाली तर.
तैं गजबजों लागे कैसा। व्याधें रुंधला मृगु जैसा।
कां बाहीं तरतां वळसा। दाटला जेवीं॥
त्यावेळी तो कसा गडबडून जातो तर ज्याप्रमाणे पारध्याने चोहोकडून वेढलेले हरीण घाबरे होते अथवा हातांनी पोहून जात असता तो पोहणारा मनुष्य ज्याप्रमाणे भोवर्यात सापडावा.
पार्था तेणें पाडें। सन्मानें जो सांकडे।
गरिमेतें आंगाकडे। येवोंचि नेदी॥
अर्जुना, तितक्या प्रमाणाने सन्मानाच्या योगाने ज्याला संकट वाटते आणि जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही.