हे अनाक्रोश क्षमा। जयापाशीं प्रियोत्तमा।
जाण तेणें महिमा। ज्ञानासि गा॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, दात, ओठ न चावता स्वभावत:च असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते.
तो पुरुषु पांडवा। ज्ञानाचा वोलावा।
आतां परिस आर्जवा। रूप करूं॥
अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप सांगतो ऐक.
तरी आर्जव तें ऐसें। प्राणाचें सौजन्य जैसें।
आवडे तयाही दोषें। एकचि गा॥
अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे की ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणासंबंधीही असेना का? ते सर्वांवर एकसारखेच असते.
कां तोंड पाहूनि प्रकाशु। न करी जेवीं चंडांशु।
जगा एकचि अवकाशु। आकाश जैसें॥
अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते.
तैसें जयाचें मन। माणसाप्रति आन आन।
नव्हे आणि वर्तन। ऐसें पैं तें॥
त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते.
जे जगेंचि सनोळख। जगेंसीं जुनाट सोयरिक।
आपपर हें भाख। जाणणें नाहीं॥
की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही.
भलतेणेंसीं मेळु। पाणिया ऐसा ढाळु।
कवणेविखीं आडळु। नेघे चित्त॥
त्याचे वाटेल त्याच्याशीही पटते आणि पाण्यासारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाविषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही.
वारियाची धांव। तैसे सरळ भाव।
शंका आणि हांव। नाहीं जया॥
वार्याचे वाहणे जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात.
मायेपुढें बाळका। रिगतां न पडे शंका।
तैसें मन देतां लोकां। नालोची जो॥
आईपुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागेपुढे पाहत नाही.
फांकलिया इंदीवरा। परिवारु नाहीं धनुर्धरा।
तैसा कोनकोंपरा। नेणेचि जो॥
ज्याप्रमाणे उमललेल्या कमळाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही.