Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीReligiousSaint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Saint Dnyaneshwar : वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो अवसांत चेइला। उद्यमीं सदैव भला।
म्हणौनि ठेवा जोडला। इच्छावशें॥
तो एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्याने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास ठेवा प्राप्त झाला.
निरालंबींची वाडी। होती त्रिभुवनायेवढी।
हे तयाचिये जोडी। रूपा आली॥
निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवनाएवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दशेला आला.
मग महाभूतांचें एकवाट। सैरा वेंटाळूनि भाट।
भूतग्रामांचे आघाट। चिरिले चारी॥
जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली महाभूतरूपी पडजमीन मशागतीने सारखी करून स्वेदजादि प्राणिवर्गाच्या चार हद्दी कायम केल्या.
यावरी आदी। पांचभूतिकांची मांदी।
बांधली प्रभेदीं। पंचभूतिकीं॥
यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या महाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणाची शरीरे तयार केली.
कर्माकर्माचे गुंडे। बांध घातले दोहींकडे।
नपुंसकें बरडें। रानें केलीं॥
मनुष्य शरीररूपी शेताच्या दोन बाजूस कर्माकर्कांच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळजमिनीची राने तयार केली.
तेथ येरझारेलागीं। जन्ममृत्यूची सुरंगी।
सुहाविली निलागी। संकल्पें येणें॥
त्या रानात येण्या-जाण्याकरिता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे जाणार नाही असे जन्म-मृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारे तयार केले.
मग अहंकारासि एकलाधी। करूनि जीवितावधी।
वहाविलें बुद्धि। चराचर॥
मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड केली.
यापरी निराळीं। वाढे संकल्पाची डाहाळी।
म्हणौनि तो मुळीं। प्रपंचा यया॥
याप्रमाणे निराळी संकल्पाची शाखा वाढते म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे.
यापरी मत्तमुगुतकीं। तेथ पडिघायिलें आणिकीं।
म्हणती हां हो विवेकीं। कैसें तुम्ही॥
याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे हे स्वभाववादी त्यांनी दाबले आहे. ते म्हणाले की, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता.
परतत्त्वाचिया गांवीं। संकल्पसेज देखावी।
तरी कां पां न मनावी। प्रकृति तयाची?॥
आता परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज जर मानावयाची तर प्रकृतिवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये?

Manini