परि असो हें नव्हे। तुम्ही या न लगावें।
आतांचि हें आघवें। सांगिजैल॥
पण हे बोलणे राहू द्या. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्रनिर्णयाच्या नादी लागू नका.
तरी आकाशीं कवणें। केलीं मेघाचीं भरणें।
अंतरिक्ष तारांगणें। धरी कवण?॥
तर आकाशामध्ये मेघात पाणी कोणी भरले? पोकळीत तार्यांचे समूह कोणी धारण केले?
गगनाचा तडावा। कोणें वेढिला केधवां।
पवनु हिंडतु असावा। हें कवणाचें मत?॥
आकाशाचे छत कोणी व कधी उभारले? वार्याने नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा?
रोमां कवण पेरी। सिंधू कवण भरी।
पर्जन्याचिया करी। धारा कवण?॥
शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो? समुद्र कोण भरतो? पावसाच्या धारा कोण करतो?
तैसें क्षेत्र हें स्वभावें। हे वृत्ती कवणाची नव्हे।
हें वाहे तया फावे। येरां तुटे॥
त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावत:च झाले असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील त्यालाच हे उपभोगास मिळते, इतरांना मिळत नाही.
तंव आणिकें एकें। क्षोभें म्हणितलें निकें।
तरी भोगिजे एकें। काळें केवीं हें?॥
असे स्वभाववादी बोलले, तेव्हा आणखी एक काळवादी रागाने म्हणाले, हे तुमचे बोलणे फार चांगले आहे. तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो?
तरी ययाचा मारु। देखताति अनिवारु।
परी स्वमतीं भरु। अभिमानियां॥
मृत्यूरूपी रागीट सिंहाची दरी आहे असे आम्हास वाटते, पण या निराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडेल काय?
हें जाणों मृत्यु रागिटा। सिंहाडयाचा दरकुटा।
परी काय वांजटा। पूरिजत असे?॥
तर या कुळाचा अनिवार तडाखा जसा पाहतात, परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो.
महाकल्पापरौतीं। कव घालूनि अवचितीं।
सत्यलोकभद्रजाती।आंगीं वाजे॥
आता काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्यलोक त्या सत्यलोकरूपी हत्तीवरसुद्धा काळाचा चपेट घात वाजतो.