जैसा ज्वरु धातुगतु। अपथ्याचें मिष पहातु।
मग जालिया आंतु। बाहेरी व्यापी॥
ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर प्रगट होण्याकरिता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहतो. कुपथ्य झाल्याबरोबर तो ज्वर शरीराला आतून बाहेरून व्यापून टाकतो.
तैसी पांचांही गांठीं पडे। जैं देहाकारु उघडे।
तैं नाचवी चहूंकडे। तो अहंकारु गा॥
त्याप्रमाणे अर्जुना, पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो त्या वेळेस देहाला चोहोकडे नाचवतो तो अहंकार होय.
नवल अहंकाराची गोठी। विशेषें न लगे अज्ञानापाठीं।
सज्ञानाचे झोंबे कंठीं। नाना संकटीं नाचवी॥
अहंकाराची गोष्ट विलक्षणच आहे. ती अशी की अहंकार हा विशेषकरून अज्ञानी पुरुषांमागे लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो.
आतां बुद्धि जे म्हणिजे। ते ऐशियां चिन्हीं जाणिजे।
बोलिलें यदुराजें। तें आइकें सांगों॥
आता बुद्धी जी म्हणावयाची ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी. ती सांगतो ऐक, असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले.
तरी कंदर्पाचेनि बळें। इंद्रियवृत्तीचेनि मेळें।
विभांडूनि येती पाळे। विषयांचे॥
तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून घेतात.
तो सुखदुःखांचा नागोवा। जेथ उगाणों लागे जीवा।
तेथ दोहींसी बरवा। पाडु जे धरी॥
त्या सुख-दु:खांच्या लुटीचा अंत:करण जेव्हा जीवाला हिशेब द्यावयास लागते, तेव्हा सुख व दु:ख या दोहोंविषयी ही जी योग्य निवड निश्चित करते.
हें सुख हें दुःख। हें पुण्य हें दोष।
कां हें मैळ हें चोख। ऐसें जे निवडी॥
हे सुख, दु:ख, पुण्य, हे पाप अथवा हे शुद्ध, हे अशुद्ध याप्रमाणे जी निवड करते.
जिथे अधमोत्तम सुझे। जिये सानें थोर बुझे।
जिया दिठी पारखिजे। विषो जीवें॥
जिला निंद्य व उत्तम कळते, जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो.