जे तेजतत्त्वांची आदी। जे सत्त्वगुणाची वृद्धी।
जे आत्मया जीवाची संधी। वसवीत असे जे॥
जे ज्ञान या पदार्थाचे उत्पत्तिस्थान आहे, जी सत्त्वगुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्यामधील जागेत राहते.
अर्जुना ते गा जाण। बुद्धि तूं संपूर्ण।
आतां आइकें वोळखण। अव्यक्ताची॥
अर्जुना, ती सर्व बुद्धी होय असे तू समज. आता अव्यक्ताचे चिन्ह ऐक.
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं। प्रकृती जे महामती।
तेचि एथें प्रस्तुतीं। अव्यक्त गा॥
हे महामते अर्जुना, सांख्यांच्या सिद्धांतांमध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे.
आणि सांख्ययोगमतें। प्रकृती परिसविली तूंतें।
ऐसी दोहीं परीं जेथें। विवंचिली॥
आणि संख्यानामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकवली. परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे तुला प्रकृतीची फोड करून सांगितली.
तेथ दुजी जे जीवदशा। तिये नांव वीरेशा।
येथ अव्यक्त ऐसा। पर्यावो हा॥
तेथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशानामक प्रकृती आहे, अर्जुना तिला अव्यक्त असे नाव आहे.
तर्हीव पाहालया रजनी। तारा लोपती गगनीं।
कां हारपें अस्तमानीं। भूतक्रिया॥
जीवरूपा प्रकृतीला अव्यक्त का म्हणावयाचे ते इथे स्पष्ट करून सांगतात तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे जसे व्यवहार थांबतात.
नातरी देहो गेलिया पाठीं। देहादिक किरीटी।
उपाधि लपे पोटीं। कृतकर्माच्या॥
अथवा अर्जुना देह गेल्यावर देहादिक उपाधी केलेल्या कर्मांच्या पोटात लीन होऊन असते.
कां बीजमुद्रेआंतु। थोके तरु समस्तु।
कां वस्त्रपणे तंतु-। दशे राहे॥
अथवा बिजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीनरूपाने असते किंवा वस्त्रपण तंतुरूपाने राहते.
तैसे सांडोनियां स्थूळधर्म। महाभूतें भूतग्राम।
लया जाती सूक्ष्म। होऊनि जेथे॥
त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन असतात.