मग तिहीं दाहे भागीं। देहधर्माच्या खैवंगीं।
अधिष्ठिलें आंगीं। आपुलाल्या॥
मग त्या दहा भागांनी देहधर्माच्या बळकटीने शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या, त्या जागांचा आश्रय केला.
तेथ चांचल्य निखळ। एकलें ठेलें निढाळ।
म्हणौनि रजाचें बळ। धरिलें तेणें॥
त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे राहिले म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बल धरले.
तें बुद्धीसि बाहेरी। अहंकाराच्या उरावरी।
ऐसां ठायीं माझारीं। बळियावलें॥
ते बुद्धीबाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धी व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले.
वायां मन हें नांव। एर्हवीं कल्पनाचि सावेव।
जयाचेनि संगें जीव-। दशा वस्तु॥
त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व ज्या मनाच्या संगतीने वस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे.
जें प्रवृत्तीसि मूळ। कामा जयाचे बळ।
जें अखंड सूये छळ। अहंकारासी॥
जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बल आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवते.
जें इच्छेतें वाढवी। आशेतें चढवी।
जें पाठी पुरवी। भयासि गा॥
जे इच्छेला वाढवते, आशेला चढवते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते.
द्वैत जेथें उठी। अविद्या जेणें लाठी।
जें इंद्रियांतें लोटी। विषयांमजी॥
जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे, ज्यायोगाने अविद्या बलवान झाली आहे, जे इंद्रियांना विषयात ढकलते.
संकल्पें सृष्टी घडी। सवेंचि विकल्पूनि मोडी।
मनोरथांच्या उतरंडी। उतरी रची॥
जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडते आणि मनोरहांच्या उतरंडी उतरते.
जें भुलीचें कुहर। वायुतत्त्वाचें अंतर।
बुद्धीचें द्वार। झाकविलें जेणें॥
जे भ्रांतीचे कोठार व वायुतत्त्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले.
तें गा किरीटी मन। या बोला नाहीं आन।
आतां विषयाभिधान। भेदू आइकें॥
अर्जुना, ते मन होय. यात अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक.