कीं भक्तिसुखालागीं। आपणपेंचि दोही भागीं।
वांटूनियां आंगीं। सेवकै बाणी॥
तथापि भक्तिसुखाकरिता आपल्यातच दोन भाग करून तो सेवाधर्म स्वीकारतो.
येरा नाम मी ठेवी। मग भजती वोज बरवी।
न भजतया दावी। योगिया जो॥
दुसर्या भागाला मी असे नाव देतो. देव व भक्त या कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणार्या लोकांना जो योगी भजनाची पद्धत दाखवतो.
तयाचे आम्हां व्यसन। आमुचें तो निजध्यान।
किंबहुना समाधान। तो मिळे तैं॥
त्याचा आम्हाला छंद असतो. तो आमच्या ध्यानाचा विषय असतो. त्याची जेव्हा भेट होईल तेव्हाच आम्हास समाधान वाटते.
तयालागीं मज रूपा येणें। तयाचेनि मज येथें असणें।
तया लोण कीजे जीवें प्राणें। ऐसा पढिये॥
त्याच्याकरिता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत.
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥
जो हर्ष पावत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा नाही आणि चांगले-वाईटविरहित जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे.
जो आत्मलाभासारिखें। गोमटें कांहींचि न देखे।
म्हणोनि भोगविशेखें। हरिखेजेना॥
जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही.
आपणचि विश्व जाहला। तरी भेदभावो सहजचि गेला।
म्हणोनि द्वेषु ठेला। जया पुरुषा॥
आपणच विश्व आहोत अशा समजुतीमुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो, म्हणून पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते.
पैं आपुलें जें साचें। तें कल्पांतींहीं न वचे।
हें जाणोनि गताचें। न शोची जो॥
आपले जे खरे ते कल्पाच्या अंतावेळीही जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही.