जंव देह हें असेल। तंव वोळगी ऐसी कीजेल।
मग देहांतीं नवल। बुद्धि आहे॥
हा देह जेथपर्यंत उभा आहे तेथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल. देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमध्ये धरीन.
इये शरीरींची माती। मेळवीन तिये क्षिती।
जेथ श्रीचरण उभे ठाती। श्रीगुरूंचे॥
जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे राहतील, त्या जागी या शरीराची माती मिळवीन.
माझा स्वामी कवतिकें। स्पर्शीजति जियें उदकें।
तेथ लया नेईन निकें। आपीं आप॥
माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन.
श्रीगुरु वोंवाळिजती। कां भुवनीं जे उजळिजती।
तयां दीपांचिया दीप्तीं। ठेवीन तेज॥
ज्या दिव्यांनी गुरूस ओवाळतात, जे दिवे श्रीगुरूंच्या मंदिरात लावतात, त्यांच्या तेजात आपल्या शरीरातील तेज मिसळीन.
चवरी हन विंजणा। तेथ लयो करीन प्राणा।
मग आंगाचा वोळंगणा। होईन मी॥
श्रीगुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन. मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन.
जिये जिये अवकाशीं। श्रीगुरू असती परिवारेंसीं।
आकाश लया आकाशीं। नेईन तिये॥
ज्या ज्या पोकळीत गुरू आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन.
परी जीतु मेला न संडीं। निमेषु लोकां न धाडीं।
ऐसेनि गणावया कोडी। कल्पांचिया॥
परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही. एक निमिष लोकांवर सोपवणार नाही. अशी ही सेवा कोट्यवधी कल्पनांचा काल मोजला तरी चालू राहील.
येतुलेंवरी धिंवसा। जयाचिया मानसा।
आणि करूनियांहि तैसा। अपारु जो॥
येथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो.
रात्रंदिवस नेणे। थोडें बहु न म्हणें।
म्हणियाचेनि दाटपणें। साजा होय॥
गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो.
तो व्यापारू येणें नांवें। गगनाहूनि थोरावे।
एकला करी आघवें। एकेचि काळीं॥
गुरुसेवा करावयाची म्हटले म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटा गुरूची सर्व सेवा एकाच काळी करतो.