विष कीं आहारीं पडे। समुद्रीं पायवाट जोडे।
एकीं वाग्ब्रह्म थोकडें। अभ्यासें केलें॥
विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विषदेखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते आटोक्यात आणले.
म्हणोनि अभ्यासासी कांहीं। सर्वथा दुष्कर नाहीं।
यालागी माझ्या ठायीं। अभ्यासें मीळ॥
म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट कठीण नाही. याकरिता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो.
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि॥
अभ्यास योगालादेखील असमर्थ असलास तरी सर्वस्वी माझ्याकरिता कर्मे करणारा हो. माझ्याकरिता कर्मे केलीस तरीदेखील तू सिद्धी मिळवशील.
कां अभ्यासाही लागीं। कसु नाहीं तुझिया अंगीं।
तरी आहासी जया भागीं। तैसाचि आस॥
अथवा अभ्यास करण्याविषयीसुद्धा तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत आहेस त्या स्थितीत राहा.
इंद्रियें न कोंडीं। भोगातें न तोडीं।
अभिमानु न संडीं। स्वजातीचा॥
इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगांना कमी करू नकोस, आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस.
कुळधर्मु चाळीं। विधिनिषेध पाळीं।
मग सुखें तुज सरळी। दिधली आहे॥
आपल्या कुळातील आचारांचे रक्षण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे, ती कर्मे कर व जी कर्मे करू नकोस असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक आहे.
परी मनें वाचा देहें। जैसा जो व्यापारू होये।
तो मी करीतु आहें। ऐसें न म्हणें॥
परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे असे म्हणू नकोस.
करणें कां न करणें। हें आघवें तोचि जाणे।
विश्व चळतसे जेणें। परमात्मेनि॥
कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले, तोच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व जाणत आहे.