उणयापुरेयाचें कांहीं। उरों नेदी आपुलिया ठायीं।
स्वजाती करूनि घेईं। जीवित्व हें॥
कर्मात काही कमी अथवा पूर्ण झाले तर त्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंत अथवा संतोष उरू देऊ नकोस. म्हणजे तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक, म्हणजे आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव.
माळियें जेउतें नेलें। तेउतें निवांतचि गेलें।
तया पाणिया ऐसें केलें। होआवें गा॥
अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे जाणार्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमानपणे कर्म करणारे होऊ दे.
म्हणोनि प्रवृत्ती आणि निवृत्ती। इयें वोझीं नेघे मती।
अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायीं॥
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हातरी करतो काय?
एर्हवीं तरी सुभटा। उजू कां अव्हाटां।
रथु काई खटपटा। करितु असे?॥
म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर.
आणि जें जें कर्म निपजे। तें थोडें बहु न म्हणिजे।
निवांतचि अर्पिजे। माझ्यां ठायीं॥
आणि जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर निमूटपणे मला अर्पण कर.
ऐसिया मद्भावना। तनुत्यागीं अर्जुना।
तूं सायुज्य सदना। माझिया येसी॥
अर्जुना, माझ्या स्वरूपाच्या अनुसंधानाने शरीरत्यागानंतर तू सायुज्यमुक्तिरूप माझ्या घरी येशील.
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्॥
मद्योगाचा आश्रय करून माझ्या ठिकाणी कर्मांचा संन्यास करण्यासदेखील तू असमर्थ असशील तर नियतचित्त होताच सर्व कर्मफलांचा त्याग कर.
ना तरी हेंही तूज। नेदवे कर्म मज।
तरी तूं गा बुझ। पंडुकुमरा॥
अथवा हेही कर्म तुला मला देववत नसेल म्हणजे मला अर्पण करवत नसेल तर अर्जुना, तू आचरण करणारा हो.