माझें असतेपण लोपो। नामरूप हारपो।
मज झणें वासिपो। भूतजात॥
माझ्या असतेपणाचा लोप व्हावा (म्हणजे मी एक अमूक आहे अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवणच होऊ नये). माझे नाव व रूप नाहीसे व्हावे. कदाचित मला पाहून प्राणिमात्र भीतील तर तसे होऊ नये.
ऐसीं जयाचीं नवसियें। जो नित्य एकांता जातु जाये।
नामेंचि जो जिये। विजनाचेनि॥
याप्रमाणे ज्याचे नवस असतात व जो सदोदित एकांतामध्ये जात असतो व एकांताच्या नावानेच तो जगतो म्हणजे त्याला एकांत इतका आवडतो.
वायू आणि तया पडे। गगनेंसीं बोलों आवडे।
जीवें प्राणें झाडें। पढियंतीं जया॥
वायूचे व त्याचे पटते, आकाशाशी बोलणे त्याला आवडते व ज्याला झाडे ही जीवाप्रमाणे आवडतात.
किंबहुना ऐसीं। चिन्हें जया देखसी।
जाण तया ज्ञानेंसीं। शेज जाहली॥
फार काय सांगावे? अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरुण झाले आहे असे तू समज.
पैं अमानित्व पुरुषीं। तें जाणावें इहीं मिषीं।
आतां अदंभाचिया वोळखीसी। सौरसु देवों॥
साधकामध्ये असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा. आता अदंभाच्या ओळखीकरिता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो.
तरी अदंभित्व ऐसें। लोभियाचें मन जैसें।
जीवु जावो परी नुमसे। ठेविला ठावो॥
ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला अरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही.
तयापरी किरीटी। पडिलाही प्राणसंकटीं।
तरी सुकृत न प्रकटी। आंगें बोलें॥
अर्जुना त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करीत नाही.
खडाणें आला पान्हा। पळवी जेवीं अर्जुना।
कां लपवी पण्यांगना। वडिलपण॥
खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने राहते काय?
आढ्यु आतुडे आडवीं। मग आढ्यता जेवीं हारवी।
नातरी कुळवधू लपवी। अवेवांतें॥
श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते.