तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी ।
एर्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥
त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, (त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्य्र आहे.
हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या ।
जाण ज्ञान तयाच्या । हातां चढें ॥
हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याचे ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज.
पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण ।
आतां आईक खूण । अहिंसेची ॥
अर्जुना अदंभपण ते हे समज. आता अहिंसेचे लक्षण ऐक.
तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं ।
आपुलालिया मतांतरीं । निरूपिली ॥
आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे. ऐक.
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनियां शाखा ।
मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥
परंतु त्यांनी सांगितलेली ही अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी (त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे.
कां बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे ।
नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा ॥
किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी, अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी.
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा ।
पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥
त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने केला आहे.
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें ।
म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥
पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन त्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे पर्जन्येष्टी यज्ञ करावेत.