तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी ।
मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ? ॥
तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामधे आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात, अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार ?
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? ।
परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥
नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय ? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे.
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा ।
जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥
आणि सर्व आयुर्वेदही (वैद्यकशास्त्रही) अर्जुना याच धोरणचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसर्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.
नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं ।
ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥
नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.
तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले ।
एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥
तो औषधयोजनेत पहिल्याप्रथम कित्येक झाडांचे कंद खाणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले.
एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली ।
एकें गर्भिणी उकडविली । पुटामाजीं ॥
काही झाडे मध्येच मोडली (म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला.) काही झाडांची साल काढवली व काही फळ देण्याच्या बेतात असलेल्या वनस्पती, त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या.
अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरा ।
ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥
(ज्यांनी) कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही, म्हणून ज्यांना शत्रु उत्पन्न झाला नाही अशा बिचार्या झाडांना (त्याचा चीक काढण्याकरता) त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले.