घरताज्या घडामोडीठामपातील १२१ खड्ड्यांची मलमपट्टी बाकी

ठामपातील १२१ खड्ड्यांची मलमपट्टी बाकी

Subscribe

शहरातील २०९४ खड्डे भरले

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात पडलेले खड्डे भरण्याचे काम मागील काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाने हाती घेत युद्धपातळीवर सुरू केले असून आता दोन हजार २१५ पैकी दोन हजार ९४ खड्ड्यांची मलमपट्टी पूर्ण केली आहे. तर उर्वरित १२१ खड्ड्यांची मलमपट्टी बाकी आहे. तेही खड्डे लवकरच भरण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत भरलेल्या खड्ड्यांमध्ये दिवा प्रभाग समितीत सर्वाधिक ४३५ खड्डे भरण्यात आले असून पालिकेने इतर प्राधिकरणांना सांगून त्यांना देखील ठाण्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सर्व्हेमध्ये समोर आलेले सर्व खड्डे भरण्याचे नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत काम पूर्ण झाले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु यंदा कोरोनाच्या काळातही शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे महापालिका टीकेची धनी होण्यापासून वाचली नाही. भाजप आणि मनसे या पक्षांनी शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आंदोलनही केले होते. परंतु पाऊस उघडीप देत नसल्याने शहरातील खड्डे बुजविणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. ऑक्टोबर महिन्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात लावलेला मुलामाही उडून जात होता. त्यामुळे देखील पालिकेवर चांगलीच टीका झाली होती. दुसरीकडे शहरातील एमएमआरडीए, एमएसआरडीसीचे असलेल्या उड्डाणपुलांवर देखील यंदा खड्डेच खड्डे असे चित्र दिसत होते.

- Advertisement -

घोडबंदर भागातील उड्डाणपुलांवरुन जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. दरम्यान, आता पाऊस उघडल्याने महापालिकेच्या माध्यमातून शहरातील खड्ड्यांचा पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात आला. त्यात २२१५ खड्डे शहरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मागील काही दिवसात खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेऊन आतापर्यंत २०९४ खड्डे बुजविण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. आता शहरात केवळ १२१ खड्डे असून ते देखील एक ते दोन दिवसात बुजविले जाणार आहेत. तर ज्या सेवा रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असेल त्यांची कामे पुन्हा नव्याने करण्याचे प्रयोजन महापालिकेने आखले आहे. तसेच एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून देखील उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -