Lockdown Crisis: काम नसल्यामुळे नैराश्यातून कास्टिंग डायरेक्टर तरुणाची आत्महत्या

suicide
आत्महत्या

अंधेरी येथे अक्क्षत उत्कर्ष नावाच्या एका २६ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अक्क्षत हा कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहत असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामठे यांनी व्यक्त केला आहे. अक्क्षत हा अंधेरीतील चार बंगला, आरटीओजवळील गोकुळ सोसायटीमध्ये भाडोत्री म्हणून राहत होता. तो चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करायचा. त्याच्यासोबत त्याची एक मैत्रिणदेखील राहत होती. रविवारी रात्री साडेआठ वाजता या दोघांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर ते दोघेही झोपण्यासाठी गेले होते. अक्क्षत हा बेडरुममध्ये तर त्याची मैत्रिण हॉलमध्ये झोपली होती. रात्री साडेअकरा वाजता तिला जाग आली, यावेळी तिला त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

ही माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला सुरुवातीला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, त्यानंतर त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला होता. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. लॉकडाऊनमध्ये अक्क्षतकडे काहीच काम नव्हता, त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासत होती, त्यातून तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, या तणावातून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी त्याच्या मैत्रिणीची जबानी नोंदविण्यात आली असून याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामठे यांनी सांगितले.