घरताज्या घडामोडीवसईत ४ कोटी ९३ लाखांची वीजचोरी ; बर्फ बनवणाऱ्या कारखान्यातील संचालकांविरुद्ध गुन्हा...

वसईत ४ कोटी ९३ लाखांची वीजचोरी ; बर्फ बनवणाऱ्या कारखान्यातील संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे.

वसई तालुक्यातील माजीवली येथील बर्फ बनवणाऱ्या ‘डायमंड आईस फॅक्टरी’ या उच्चदाब वीज ग्राहकाकडील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट बसवून गेल्या ५९ महिन्यांपासून या कारखान्याने ४ कोटी ९३ लाख ९८ हजार ४६० रुपये किंमतीची २७ लाख ४८ हजार ३६४ युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विरार पोलीस ठाण्यात कारखान्याच्या चार संचालकांसह वीज चोरीची यंत्रणा बसवणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मन्सूरभाई वालजीभाई कानान, शहाबुद्दीन अब्बास समनानी, बदरुद्दीन नानजी ओलचिया, निजार नानजी ओलचिया व एक अज्ञात व्यक्ती अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. माजीवली येथे पारोळा ते भिवंडी रस्त्यालगत ‘डायमंड आईस फॅक्टरी’ हा बर्फ बनवणारा कारखाना आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण व चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश जाधव यांच्या पथकाने ३० ऑक्टोबरला दुपारी कारखान्याच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. ३१ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत सखोलपणे केलेल्या तपासणीत मीटरकडे जाणाऱ्या तिन्ही सीटीमध्ये प्रत्येक फेजच्या वायरिंगमध्ये काळया, पिवळया व निळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या गुंडाळून आत इलेक्ट्रानिक सर्किट जोडल्याचे आढळून आले. रिमोट कंट्रोलच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक सर्किट नियंत्रित करून कारखान्याच्या प्रत्यक्ष वीजवापराची मीटरमध्ये कमी नोंद होईल, अशी व्यवस्था केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले. तपासणीच्या वेळी उपस्थित संचालक मन्सुरभाई कानानी यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी रिमोट कंट्रोल ताब्यात दिला नाही.

- Advertisement -

बर्फ बनवणारा कारखाना व कारखान्याच्या आवारातील पाच रहिवासी खोल्यांसाठीही विजेचा चोरटा वापर करण्यात येत होता. नोव्हेंबर २०१६ पासून ऑक्टोबर २०२१ पर्यंत वीजचोरीचा हा प्रकार सुरू होता. वीज कायदा २००३ च्या कलम १३८, १३५ आणि १५० अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कारवाई करणाऱ्या पथकात अधीक्षक अभियंता चव्हाण, कार्यकारी अभियंता जाधव, उपकार्यकारी अभियंता पराग भिसे, रमेश टाक, सहायक अभियंते विनायक लांघी, योगेश पाटील, वैभव मोरे, हर्षल राणे यांचा समावेश होता. विरार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी व सहायक विधी अधिकारी राजीव वामन यांनी या कारवाईत सहकार्य केले.


हे ही वाचा – Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव, १० जणांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -