ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे प्रकरणी ४ अधिकारी निलंबित, पालकमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर धडक कारवाई

ठेकेदारांनाही नोटिसा बजावणार

ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे प्रकरणी ४ अधिकारी निलंबित, पालकमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर धडक कारवाई

एकीकडे रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांच्या पाहणी दौर्‍यात नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांपासून इतर संबंधित विभागांच्या सर्व अधिकार्‍यांना खडेबोल सुनावले. संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर तात्काळ काही तासांतच तडकाफडकी ठाणे महापालिका प्रशासनाने कार्यकारी अभियंता चेतन पटेल, प्रकाश खडतरे, कनिष्ठ अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड या चार अधिकार्‍यांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पटेल हे उथळसर, खडतरे हे वर्तकनगर तर दोन्ही संदीप हे लोकमान्य-सावरकर नगर या प्रभाग समितीचे अधिकारी आहेत. अशाप्रकारे एकावेळी चार अधिकार्‍यांवर निलंबनाची ही बहुदा महापालिकेतील पहिलीच वेळ असावी.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे आहेत. खड्ड्यांमुळेच वाहतूक संथगतीने होते. जेणेकरून वाहतूक कोंडी तयार होते. वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेमार्फत शहरातील सर्व खड्डे भरून सर्व रस्ते सुस्थितीत केले होते. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर परत परत खड्डे पडत असल्याने दुरुस्तीमध्ये निकृष्ट दर्जाची कामे केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यातच संबंधित प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंता या नात्याने आपल्या पर्यवेक्षणाखालील क्षेत्रासाठी रस्ते सुस्थितीत ठेवण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. मागील काही महिन्यांपासून रस्ते दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तथापि, रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली नसून आजदेखील रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. खड्डे दुरुस्तीची निविदा मंजूर असताना तसेच याबाबतीत अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यात आली असताना देखील रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे गुणवत्तेने न केल्याने व ते वेळेत केल्याने रस्ते खराब होत आहेत. निविदांप्रमाणे खड्डे भरून रस्ते सुस्थितीत ठेवताना आपण या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही किंबहूना संबंधित कंत्राटदारावर निकृष्ट दर्जाचे कामकाज केल्याबाबत कार्यवाही प्रस्तावित केल्याचेसुद्धा दिसून येत नाही.

यासाठी प्रशासकीयरित्या आपण जबाबदार ठरतात. तसेच वारंवार सूचना देऊनही रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येत नसल्याने आपल्या या बेजबाबदार वर्तनामुळे सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांमुळे केवळ वाहतूक कोंडी होत नाही, तर अपघातांचे प्रमाण वाढत असते व असे अपघात जीवघेणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना आपले असे बेजबाबदार पद्धतीचे वर्तन हे लोकशाही तसेच लोकाभिमुख प्रशासनास इजा पोहोचणारे आहे आणि याबाबत त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवून निलंबित केले आहे. या संदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे यांनी आदेश जारी केले आहेत. तर निलंबन कालावधित संबंधित अधिकार्‍यांचे कार्यालय मुख्यालय येथे ठेवण्यात येत आहे, असेही स्पष्ट म्हटले आहे.

ठेकेदारांनाही नोटिसा बजावणार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाहणी दौर्‍यात ठिकठिकाणी जाऊन स्वतः केलेल्या कामाची गुणवत्ता तपासली होती. त्यानंतर कामात गुणवत्ता नसलेल्या ठेकेदारांना देखील ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले होते. ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता ठेकेदारांनाही नोटिसा काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

इतर अधिकार्‍यांवर कारवाई कधी?

ठाणे महापालिका क्षेत्रात असलेले उड्डाणपूल हे एमएसआरडीसीच्या अंतर्गत येत असून या उड्डाणपुलावर देखील खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांच्या पाहणी दौर्‍यात इतर प्राधिकरणाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ठाणे पालिकेच्या अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली असली तरी इतर प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार का?, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.


हेही वाचा : रिक्षा-ट्रक अपघातात ५ ठार, अंत्यविधीसाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला