घरताज्या घडामोडीपूर्व उपनगरातील नालेसफाईचे ६० टक्के काम पूर्ण; स्थायी समिती अध्यक्षांचा दावा

पूर्व उपनगरातील नालेसफाईचे ६० टक्के काम पूर्ण; स्थायी समिती अध्यक्षांचा दावा

Subscribe

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या ८० टक्के कामांपैकी आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्षांनी केला आहे.

पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह केली आणि नालेसफाईच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या ८० टक्के कामांपैकी आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा जाधव यांनी केला. तसेच पूर्व उपनगरातील रस्त्यांच्या कामांचीही पाहणी करून समाधान व्यक्त करत रस्त्यांची कामे २४ तास करत पावसाळ्यापूर्वी दिलेले लक्ष्य कसे गाठता येईल? याचा प्रयत्न करावा, असे निर्देश प्रशासनाला दिले.

पूर्व उपनगरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामाची स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांच्यासमवेत गुरुवारी पाहणी केली, पाहणीच्या या दुसऱ्या दौऱ्याला पूर्व उपनगरापासून सुरुवात करण्यात आली. कुर्ला (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील शितल सिनेमापासून या दौऱ्याला सुरुवात झाली. एलबीएस मार्गावर पाणी भरणाऱ्या ठिकाणांची आणि याठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यामध्ये शितल सिनेमा, संजय नगर पोलीस चौकी, कुर्ला (पश्चिम), महेंद्र पार्क जंक्शन, घाटकोपर, साईसृष्टी बिल्डिंगजवळील आंबेवाडी जंक्शन, चेंबूरमधील आर. सी. मार्ग, इंदिरानगर याठिकाणची पाहणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावरील लक्ष्मीबाग नाल्याची पाहणी केली. या नाल्यामधून आतापर्यंत किती गाळ काढण्यात आला आहे याची माहिती घेऊन उर्वरित काम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. त्याचबरोबर मानखुर्द मधील सुभाष नगर नाल्याची पाहणी केली. हा नाला खाडीला जाऊन मिळत असल्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये तरंगता कचरा वाहून येत असल्याचे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी सांगितले. याबाबत खाडीच्या मुखाशी संरक्षक जाळी बसवावी, जेणेकरून हा कचरा नाल्यामध्ये वाहून येणार नाही, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर चेंबूरच्या इस्लामपुरा येथील मुकुंदनगर नाल्याची पाहणी केली. नाल्याची साफसफाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपूल, एलबीएससह इतर रस्त्यांची पाहणी

सायन स्टेशन ते चेकनाका पर्यंत संपूर्ण २१ किलोमीटरच्या एलबीएस मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची सुद्धा पाहणी केली. या मार्गावर येणारे अतिक्रमणे काढून हा मार्ग रुंदीकरण करण्यात येत आहे. शंभर फुटाच्या या मार्गावर पदपथाची कामे चांगले रीतीने पूर्ण करून हा रस्ता गतीने पूर्ण करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच २.१ किलोमीटरच्या घाटकोपर -मानखुर्द लिंक रोड उड्डाण पुलाच्या कामाचीही पाहणी केली. तीन लेन असलेला उड्डाणपूल मुंबई महानगरपालिका प्रथमच बांधत असून २०२१ पर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना सांगितले. तसेच धामा चौकी ते सुमन नगर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण काढून नव्याने १.४ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना सांगितले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना यशवंत जाधव यांनी नालेसफाई आणि रस्ते पाहणीचा हा दुसरा दौरा असून ही कामे व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी ही पाहणी करत असल्याचे सांगितले. नालेसफाई आणि रस्त्यांची कामे २४ तासही गतीने पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी लाँकडाऊनमुळे रस्त्यावरील जंक्शनची कामे गतीने पूर्ण करण्यात येत असल्याचेही सांगितले. यावेळी पाहणी दौऱ्याला स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) उपेंद्र सावंत, नगरसेवक परमेश्वर कदम, सुरेश पाटील, उप आयुक्त (पायाभूत सुविधा कक्ष) संजय दराडे, प्रमुख अभियंता (पजवा) संजय जाधव आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – समन्वय गोंधळाचा अजून एक नमुना! महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांना मनस्ताप!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -