SSC Result: रायगडमध्ये दहावीचा निकाल ९६.०६ टक्के

96.6 percent ssc results in raigad
SSC Result: रायगडमध्ये दहावीचा निकाल ९६.०६ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल ९६.०७ टक्के लागला. या परीक्षेसाठी ३५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर ३५ हजार १६० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २० टक्क्यांची वाढ झाली, मात्र बारावीच्या परीक्षेत यंदा मुंबई विभागात अव्वल स्थान पटकाविणारा रायगड जिल्हा दहावीच्या परीक्षेत शेवटच्या स्थानी आहे.

अपेक्षेप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होण्यात मुलांना मागे टाकून मुलींनी बाजी मारली. ९४.९१ टक्के मुले, तर ९७.३३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी त्यापैकी ३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रायगड जिल्ह्यात १८ हजार ३५७ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार २९८ मुले परीक्षेला बसली होती. त्यातील १७ हजार ३६७ उत्तीर्ण झाले. १६ हजार ९३९ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १६ हजार ८६२ मुली परीक्षेला बसल्या. त्यापैकी १६ हजार ४११ मुली उत्तीर्ण झाल्या. यात १० हजार ४२८ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १३ हजार २९० विद्यार्थ्यांना प्रथम वर्ग मिळाला. ८ हजार ४० द्वितीय श्रेणीत, तर २ हजार २० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि महाड तालुक्यांचा सर्वाधिक ९७.२८ टक्के निकाल लागला. खालापूर तालुक्याचा सर्वात कमी ९३.०४ टक्के निकाल लागला.

तालुकानिहाय निकाल पनवेल ९७.२८ टक्के, उरण ९४.४३, कर्जत ९४.९४, खालापूर ९३.०४, सुधागड ९४.२३, पेण ९५.५५, अलिबाग ९६.०५, मुरुड ९६.३५, रोहे ९६.४३, माणगाव ९७.२०, तळे ,९५.७८, श्रीवर्धन ९४.९३, म्हसळे ९५.३४, महाड ९७.२८ आणि पोलादपूर ९५.८३. दरम्यान, नागोठणे येथील अग्रवाल विद्यामंदिराचा निकाल दहावी परीक्षेचा निकाल ९६.५० टक्के लागला असून, प्राची कदम पहिली आली आहे. तर एस. डी. परमार इंग्लिश स्कूल, उर्दू हायस्कूल आणि होली एंजल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, तेथे अनुक्रमे संचिता भोय, अस्मिन मुल्ला आणि श्रेया तुरे या तिघी पहिल्या आल्या आहेत. विभागातील वांगणी शाळा आणि पेट्रोकेमिकल विद्यामंदिराचाही निकाल १०० टक्के लागला असून, सुजल धाडवे आणि समृद्धी पवार या पहिल्या आल्या आहेत. खालापूरच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाचा निकाल ९२.८५ टक्के लागला असून, दीक्षा पाटील प्रथम आली. मुरुडच्या सर एस. ए. हायस्कूलचा निकाल ९८.५० टक्के लागला असून, रिंकल माळी ही विद्यार्थिनी प्रथम आली आहे.