बिबट्याच्या हल्ल्यातून सहा दिवसाच्या बाळाला अपंग पित्याने वाचविले

बारा तासानंतर बिबट्या जेरबंद

कल्याण । मलंग गडच्या जंगल खोर्‍यातून वाट चुकलेला बिबट्या कल्याण पूर्वेत नागरी वसाहतीत घुसल्याने येथील नागरिकांमध्ये भीती पसरली. भुकेने व्याकुळ झालेल्या या बिबट्याने पहिले सावज टिपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका हाताने अपंग असलेल्या पित्याने त्याच्या सहा दिवसाच्या बाळाला वाचविण्यास शर्थीचे प्रयत्न करीत बिबट्याशी यशस्वी झुंज दिली आणि बिबट्याला पळवून लावले.

यामुळे ही अपंग व्यक्ती जबर जखमी झाली असून त्यांना ४० टाके पडले आहेत.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा विभागातील श्रीराम अनुग्रह इमारतीत राहत असणारे एका हाताने अपंग असणारे राजू पांडे आपल्या सहा दिवसाच्या अपत्याला सूर्यकिरणांचे कोवळे उन्हाचा शेक देण्यासाठी घराबाहेर बाळाला घेऊन आले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याने भूक भागविण्यासाठी पांडे यांच्यावर झडप घातली. एका हाताने अपंग असणार्‍या पांडे यांनी आपल्या अपत्याला छातीशी कवटाळून ठेवत बिबट्याचा हल्ला स्वतःवर झेलत त्याचा मुकाबला करीत बाळाचे प्राण वाचवले.

बिबट्याने या हल्ल्यात एका हाताने अपंग असणार्‍या राजू पांडे यांना जबर जखमी केले. बिबट्याने डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर चावा घेत त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र जीवावर बेतत आपल्या अपत्याला वाचविण्यास त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. यामुळे या हल्ल्यात सहा दिवसाच्या बाळाला थोडीही इजा झाली नाही. गोंधळ आणि गडबडीत एकीकडे बिबट्याने पांडे यांना घायळ केले असतानाच त्यांचा मोठा भाऊ मनोज पांडे यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केल्याने मोठ्या संख्येने नागरिक जमू लागताच बिबट्या बाजूच्या इमारतीत घुसला.

बिबट्याने  2 जणांनाही किरकोळ जखमी केले. उल्हासनगर येथील एका खासगी रुग्णालयात राजू पांडे यांना उपचारार्थ दाखल केले असून त्यांच्या डोक्याला जबर जखम झाल्याने 40 टाके पडले गेले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाढत चाललेल्या वाढत्या शहरीकरणामुळे मलंगगडच्या जंगलामध्ये बिबट्याचा वावर असल्याची शक्यता वनाधिकार्‍यांनी वर्तवली आहे. नॅशनल पार्क बोरिवली येथे बिबट्याला नेण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत वनाधिकारी चन्ने यांनी सांगितले की अग्निशमन दल, पोलीस, पॉज, वॉर या प्राणी मित्र संस्थेने या मोहिमेत मदत केल्याचे सांगण्यात आले.

मलंग गडच्या जंगल खोर्‍यातून वाट चुकलेला बिबट्या कल्याण पूर्वेत नागरी वसाहतीत घुसल्याने  येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता चार वर्षे वयाचा बिबट्या कल्याण पूर्वेतील चिंचपाडा विभागातील श्रीराम अनुग्रह इमारतीच्या नागरी वस्तीत आढळला.
शहरातील गर्दी पाहून भेदरलेल्या या बिबट्याने तीन जणांवर हल्ला केल्याची माहिती कल्याणचे वनपरिक्षेत्रपाल संजय चन्ने दिली. वनविभागाला बिबट्याची माहिती समजताच कर्मचारी टीम सह घटनास्थळी गेले. मात्र येथील दोन इमारतीमधील अंतर कमी असल्याने बिबट्या दोन्ही इमारतीत झेप घेत वावर करीत होता.
इमारतीच्या चारी बाजूंनी जाळी लावत खालील गेट बंद केला. त्यामुळे बिबट्या इमारतीतच अडकला. या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षिततेसाठी दाराचे कडे कोयंडे लावून घरातच बसण्याचे सांगण्यात आले. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान डॉक्टरांनी ट्रॅक लाईट (गुंगीचे द्रव) गनने दोन इंजेक्शन मारूनही हा बिबट्या बेशुद्ध पडत नसल्याची माहिती संजय चन्ने यांनी दिली. त्यानंतर बराच वेळेनंतर बिबट्या बेशुद्ध पडला. बिबट्यामुळे धोका नसल्याचे हेरून वनविभागाने सतर्कतेने बिबट्याला ताब्यात घेतले आणि वनविभागाच्या विशेष वाहनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशूवैद्यकीय विभागात बिबट्याला नेण्यात आले. बिबट्या नागरी वस्तीत शिरल्याचे समजताच काही बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र या गर्दीमुळे बिबट्या बिथरण्याची शक्यता असल्याने पोलीस आणि वनविभागाने कौशल्याने परिस्थिती हाताळली.

रुग्णालयातील खर्च देण्याची मागणी
बिबट्याच्या हल्ल्यात आपल्या सहा दिवसाच्या अपत्याला वाचवून जबर जखमी झालेले एका हाताने अपंग असलेले राजू पांडेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुग्णालयात होत असणारा खर्च सरकारने करावा अशी मागणी त्यांचे मोठे भाऊ मनोज पांडे यांनी केली आहे.