आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर शस्त्राने हल्ला, अधिकाऱ्यांसह दोघे जखमी

Accused attack on police, officers injured in thane
आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर शस्त्राने हल्ला, अधिकाऱ्यांसह दोघे जखमी
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांवर आरोपीने घातक शस्त्राने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री ठाण्यात घडली. जखमी अवस्थेतही गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यांसह दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वर्तक नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवनाथ विष्णू गांगुर्डे (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नवनाथ धांगडे हा सराईत गुन्हेगार असून त्याला एका खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. संचित रजेवर (पॅरोल)वर तुरुंगातून बाहेर आलेला नवनाथ हा संचित रजा संपल्यावर देखील तुरुंगात परत न गेल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध घेण्यात येत असताना नवनाथ धांगडे हा ठाण्यातील श्रीनगर परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक १ यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दत्ता सरक आणि त्यांचे पथक नवनाथ याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने घातक शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक दत्ता सरक आणि पोलीस शिपाई आनंदा भिलारे हे जखमी झाले. जखमी अवस्थेत ही पोलिसांनी नवनाथ गांगुर्डेला अटक करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. हल्ल्यात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक दत्ता सरक आणि शिपाई आनंदा भिल्लारे यांना वर्तक नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात नवनाथ धांगडे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात नवनाथ धांगडेला अटक करण्यात आली आहे.
नवनाथ धांगडे याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता, या गुन्ह्यात नवनाथ याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. तुरुंगात शिक्षा भोगत असताना नवनाथ धांगडे हा संचित रजेवर तुरुंगातून बाहेर आला होता, मात्र संचित रजा संपवून ही तो तुरुंगात परत न गेल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात होता. दरम्यान ठाणे गुन्हे शाखा घटक १च्या पथकाने गुरुवारी रात्री त्याला ठाण्यातील वर्तक नगर परिसरातून अटक केली. यादरम्यान झालेल्या हल्ल्यात आमचा एक अधिकारी आणि एक शिपाई जखमी झाले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.