Dmart VS MNS : अ‍ॅमेझॉननंतर आता डी – मार्टलाही मनसेचा खळखट्याकचा इशारा

मराठी भाषेचा वापर करण्याकडे डी-मार्टकडून दुर्लक्ष

After Amazon, now D-Mart is also being warned by MNS
Dmart VS MNS : अॅमेझॉननंतर आता डी - मार्टलाही मनसेचा खळखट्याकचा इशारा

महाराष्ट्रात डी-मार्ट स्टोअर्स मोठ्या प्रमाणात असून येथे माफक दरात वस्तू उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा डि-मार्टमध्ये खरेदी-विक्रीसाठी येण्याचा कल जास्त आहे. महाराष्ट्रातील मराठी जनतेकडून डी-मार्टमधून कोट्यावधी रुपयांची खरेदी केली जाते. मात्र डी-मार्ट स्टोअर्सवरील नामफलक इंग्रजी भाषेत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना जी बिले दिली जातात, त्यामध्ये वस्तूंची यादीही इंग्रजीमधून असते. याव्यतिरिक्त जे स्टीकर आहेत तेही इंग्रजी भाषेतून लावले जातात. त्यामुळे मराठी भाषेचा वापर करण्याकडे डी-मार्टकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील मातृभाषा मराठी असताना दुकानातील व्यवहार पाट्या, बिल या गोष्टींसाठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रदेश उपाध्यक्ष नितीन काळे यांनी कळंबोली येथील डी मार्टमध्ये स्टोअर व्यवस्थापकाला पत्र देऊन मराठीचा वापर करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांना वस्तूचे बिल देताना डी-मार्ट अ‍ॅपमध्ये इंग्रजीबरोबर मराठीचाही समावेश असावा. जेणेकरून मराठी भाषिक ग्राहकांसाठी सोयीचे होईल, असे नितीन काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सर्व वस्तूंची माहिती अथवा वस्तूंवर मिळणारी सूट याची माहिती सर्वप्रथम मराठी भाषेत करावी, नंतर इतर भाषेचा वापर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. या मागणीची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईल,असे कळंबोली डी-मार्ट स्टोअर मॅनेजरकडून सांगण्यात आले आहे.

याअगोदरही ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’ असे ठणकावत अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. या मागणीवरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत अ‍ॅमेझॉनचं कार्यालय व वेअरहाऊसवर धडक देत तोडफोड केली होती.


हे ही वाचा – दिल्लीवरुन महाविकास आघाडी सरकारला रोज त्रास दिला जातोय – शरद पवार