माताच बनल्या मारेकरी; १५ दिवसांत तीन मुलींची त्यांच्या आईकडूनच हत्या

baby killed
प्रातिनिधिक छायाचित्र

‘माता न तू वैरिणी’ अशा प्रकारची एक म्हण मराठीत आहे. जीवन देणारी आईच जेव्हा ते जीवन हिरावून घेते, तेव्हा तिला माता नाही तर वैरिणी म्हणतात. खरंतर आईसाठी आपलं बाळ हे सर्वस्व असतं. बाळासाठी रात्रीच्या अंधारात पर्वताचा कडा उतरणारी हिरकणी आपल्याला माहीत आहेच. पण मध्य प्रदेशात आईचे क्रूर रुप समोर आले आहे. मागच्या १५ दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये इथे तीन चिमुकल्या मुलींची त्यांच्याच आईंनी निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात या घटना घडल्या आहेत. एका आईने आपले बाळ तलावात फेकले, दुसरीने पाण्याच्या टाकीत डुबवून बाळाला मारले तर आजच्या एका ताज्या घटनेत आईने आपल्या २ दिवसीय मुलीची चाकूने वार करुन हत्या केली आहे.

भोपाळच्या अयोध्या नगर परिसरात पोलिसांना एका मंदिरात दोन दिवसाच्या बाळाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर एका कपड्यात लपेटलेल्या अवस्थेत बाळाचा मृतदेह आढळून आला. या बाळाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले होते. तसेच कुत्र्यानेही शवाचे लचके तोडलेले दिसत होते. पोलिसांनी अज्ञान मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी शहरातील खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये मागच्या दोन दिवसांत प्रसुती होणाऱ्या महिलांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. तसेच आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे.

१७ सप्टेंबर रोजी भोपाळमध्येच एका महिलेने मुलाच्या अट्टहासापोटी आपल्या एक महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले होते. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना खोटी माहिती दिली होती. मात्र आपला खाक्या दाखविल्यानंतर आईने खून केल्याचे कबूल केले. सध्या आरोपी आई तुरुंगात आहे.

तर १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेत आईने आपल्या प्रियकरासाठी ९ महिन्यांच्या मुलीला तलावात फेकून दिले होते. पाण्यात बुडल्यामुळे या तान्हुलीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी मातेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.