घरताज्या घडामोडीमुरुड समुद्र किनार्‍यावर शेवाळीचे साम्राज्य, जोरदार वार्‍यासह भरतीचा परिणाम

मुरुड समुद्र किनार्‍यावर शेवाळीचे साम्राज्य, जोरदार वार्‍यासह भरतीचा परिणाम

Subscribe

जोरदार थंड वारे आणि उसळलेल्या भरतीमुळे येथे, तसेच मुरुड शहरासह तालुक्यातील अन्य सागरी किनार्‍यांवर शेवाळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. किनारी मोठ्या प्रमाणात शेवाळ आल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आणि सकाळ, संध्याकाळ किनार्‍यावर रपेट मारणार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.

मुरुड किनार्‍यावरील नवाबाचा राजवाडा ते शहरातील कोळीवाडा परिसर या 3 किलोमीटरच्या किनार्‍यावर, तसेच नांदगावच्याही समुद्र किनारी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात शेवाळ वाहून आली आहे. जोरदार भरतीमुळे खोल समुद्रात उलथापालथ होऊन तळाशी असणारी शेवाळ उखडून ती किनार्‍यावर पाण्याबरोबर वाहून आल्याचे जाणकार सांगतात. खोल समुद्रातील तळाला असलेल्या मोठमोठ्या खडकांना चिकटलेली शेवाळ हे माशांचे खाद्य आहे.

- Advertisement -

शनिवारपासूनच संपूर्ण मुरुड तालुक्यात ढगाळ वातावरण असून, हवेतील गारवा कमालीचा वाढला आहे. सतत गार वारे वाहत असल्याने हुडहुडी भरविणारी थंडी पुन्हा सुरू झाली आहे. कोसळलेल्या अवकाळी पावसानेही या थंडीला हातभार लावला आहे. अचानकपणे वातावरणात बदल झाल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही झाला आहे. विशेष करून याचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.

 

- Advertisement -

ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू उत्पादक धास्तावले

सातत्याने पडणार्‍या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादन धोक्यात आलेले असतानाच पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, हा अंदाज अवकाळीने तंतोतंत खरा ठरवला आहे. तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात आलेला आंब्याचा मोहर गळून पडला आहे. तर काजूला आलेला मोहर देखील त्या वातावरणामुळे खराब होत आहे. सातत्याने बदलणार्‍या वातावरणामुळे यावर्षी आंबा आणि काजूला मोहर आलेला नाही. परिणामी आंबा उत्पादन कमी प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असतानाच अवकाळी पावसाने किरकोळ प्रमाणात आलेला आंबा आणि काजू मोहर नष्ट होणार आहे.
तालुक्यात काही भागात पाऊस पडल्याने वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. रविवारी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने आंबा आणि काजू फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या यादीनुसार जवळपास 250 आंबा उत्पादक आहेत. या उत्पादकांना यावर्षी आंबा पीक घेताना बदलत्या वातावरणाचा परिणाम सहन करावा लागणार आहे. आंबा उत्पादन कमी प्रमाणात येणार असल्याने आंबा अधिक दराने बाजारात येण्याची शक्यता शेतकर्‍यांनी वर्तवली. ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -