दहशतवादी हल्ल्याची भीती असूनही मुंबई-रायगडातील सागरी सुरक्षा रामभरोसेच

झालाच हल्ला तर तो परतवून लावण्याची पुरेपूर तयारी नौदलाने केली असली तरी मुंबईसह कोकणच्या किनारपट्टीची सुरक्षा मात्र उदासीनच असल्याचे दिसते.

Although the navy is vigilant, there is no security along the coast
दहशतवादी हल्ल्याची भीती असूनही मुंबई-रायगडातील सागरी सुरक्षा रामभरोसेच

समुद्री हल्ल्याची भीती असलेल्या कोकणच्या विशेषत: मुंबई आणि रायगड किनार्‍याच्या सुरक्षेची अवस्था रामभरोसे असल्याचे चित्र आहे. मुंबई आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या किनारपट्टींवरील अत्यंत महत्वाच्या प्रकल्पांना धोका पोहोचवण्यासाठी ‘कसाब’ पध्दतीचा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन नौदलाने कुलाबा येथे संयुक्त मोहीम केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या उभारणीनंतर मुंबईबरोबरच आसपासचे किनारे फारशे सुरक्षित नाहीत, असे अनुमान काढले जात आहे. यातच मुंबई आणि आसपासचे समुद्र किनारेही सुरक्षेच्या द़ृष्टीने दुर्लक्षित झाल्याचे दिसते.

२६/११च्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि आसपासच्या महत्वाच्या किनारपट्टीवर दहशदवादी हल्ले होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नौदलाने मुंबईत कुलाबा येथे हे संयुक्त मोहीम केंद्र उभारले आहे. या केंद्रातून इतर १८ विविध संस्थांच्या मदतीने नौदलाच्या वतीने किनारपट्टीवर देखरेख ठेवली जात आहे. समुद्रातील हालचाली टिपण्याबरोबरच इतर गुप्त माहितीचे विश्लेषण करून माहितीची देवाणघेवाण या केंद्रातून केली जाणार आहे. यातून हालचालींचा अंदाज काढला जाणार आहे. नौदलाच्या या केंद्रामुळे दहशतवादी हल्ला झालाच तर तो समुद्री मार्गेच होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. याच अंदाजाचा भाग म्हणून या केंद्राकडे अधिक खबरदारीने पाहिले जात आहे.

झालाच हल्ला तर तो परतवून लावण्याची पुरेपूर तयारी नौदलाने केली असली तरी मुंबईसह कोकणच्या किनारपट्टीची सुरक्षा मात्र उदासीनच असल्याचे दिसते. किनार्‍यांवर धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हे किनारे पोलीस सुरक्षेच्या निगराणीखाली आणण्याची आवश्यकता होती. मात्र तरीही कोकणातील एकाही किनार्‍यावर विशेष असे बंदोबस्त नाही. कोकणच्या किनारपट्टीवर सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली असली तरी या पोलीस ठाण्यांनी कोणतीही विशेष मोहीम समुद्र वा किनार्‍यांवर आजवर राबवली नसल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि आसपासच्या किनार्‍यांवरील महत्वाचे प्रकल्प असलेल्या किनारपट्टीला संरक्षण देण्याची कोणतीही तजवीज न करण्यात आल्याने हे किनारे शहरांसाठी धोकादायक ठरू शकतात, असे सांगितले जाते. यामुळे किनार्‍यावर ये-जा करणार्‍यांवर कोणतेही निर्बंध नसल्याचेच चित्र आहे. एकीकडे नौदलाने सुरक्षेची बाजू उचलून धरली असताना दुसरीकडे पोलीस मात्र किनारपट्टीकडे बिनदिक्कत दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.


हे ही वाचा – Maharashtra School Reopen : राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु होणार; वर्षा गायकवाड यांची माहिती