पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट अद्याप बंदच!

‘साबां’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Ambenali-Ghat-still-closed
अंबेनळी घाट अद्याप बंदच!

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून वाहतुकीस बंद झालेला अंबेनळी घाट अद्याप वाहतुकीस खुला न झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ब्रिटीशकालीन वारसा असलेला हा घाट पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असून, येथून सातारा आणि पुणे येथेही जाता येते. अरूंद असलेल्या या घाटात अनेकदा विकासाच्या नावाखाली करोडोची कामे करण्यात आली असून, अलिकडच्या काही वर्षांत दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे नेमके किंवा शास्त्रोक्त कारण न शोधता जुजबी उपाययोजना करून घाट वाहतुकीसाठी मोकळा ठेवला जातो.
या मार्गावरून महाबळेश्वर, पांचगणीकडे जाणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असून, याशिवाय अन्य प्रवासी आणि माल वाहतूकही होत असते. सध्या हा घाट बंद असल्याने वाहनांना वरंध किंवा चिपळूण मार्गे जा-ये करावी लागत आहे. यात नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज जा-ये करणार्‍यांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी कधी पूर्ववत होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हा घाट मार्ग अलिकडच्या काळात पावसाळ्यात दरडीच्या रूपात कोसळू लागला असल्याने यावर संशोधन होणे आणि अभ्यासपूर्ण उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आतापर्यंत या घाटात वारंवार विकासाच्या नावावर करण्यात येणार्‍या सरकारी निधीच्या उधळपट्टीला पायबंद बसेल. तालुक्यातील पायटा गावापासून हा घाट सुरू होतो. २३ जुलैच्या ‘न भुतो’ असा उच्चांकी ५५० मिलिमीटर पाऊस या परिसरात कोसळळा आणि चिरेखिंडीपासून वाडा येथील देवीच्या मंदिरापर्यंतच्या अंतरात महाकाय दरडीही कोसळल्या.

पुढे महाबळेश्वर हद्दीत मेटतळे गावाच्या अलिकडे दरडी कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणावर घाटमार्ग क्षतिग्रस्त झाला आहे. सुदैवाने तेव्हा या मार्गावरून वाहनांची वर्दळ नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ अटळ होता. रस्ता बंद असल्याने स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. हा मार्ग घाटमाथ्यावरील पुणे, सातारा जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे शासनाने या महत्त्वाच्या मार्गाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आंबेनळी घाटाला ऐतिहासिक दर्जा

फार पूर्वी या घाटातून तालुका हद्दीतील आडगावच्या पेठेत सातारा-कर्‍हाडमार्गे व्यापारी मसाल्याचे पदार्थ घेऊन येत असत आणि येथून मुंबई बेट आणि तळ कोकणात व्यापार चालत असे. पुढे ब्रिटिशांनी १८७१ ते १८७४ दरम्यान हा घाट मार्ग बांधला त्या काळात त्याला ‘फिट झिराल्ड’ असे नाव होते. अशा या ऐतिहासीक वारसा लाभलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या आणि समुद्र सपाटीपासून 2 हजार फूट उंचावर असलेल्या या घाट मार्गाच्या उशाला महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. बारमाही गारवा असलेला आणि निर्सगरम्य असा हा परिसर आहे.

 

                                                                                                              -बबन शेलार 


हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून पीए पालांडे आणि शिंदेविरोधात आरोपपत्र दाखल