ठाणे: आधी अँटिजन टेस्ट मग आरटीओत प्रवेश

एका दिवसात आठ जण पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Antigen test will have to be done before entering the RTO office in Thane
ठाणे: आधी अँटिजन टेस्ट मग आरटीओत प्रवेश

कोरोनाचा विळखा हळुहळू पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांसोबत प्रशासनाची धास्ती वाढू लागली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात प्रवेश करताना आता नागरिकांना अँटिजन टेस्ट करावी लागणार आहे. मंगळवारी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून आता आरटीओ कार्यालयात प्रवेश करणाऱ्यांना अँटिजन टेस्ट करावी लागणार आहे.

सदरची अँटिजन टेस्ट ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे केली जाणार आहे. सध्या कार्यालयात येणाऱ्यांपैकी काही जणांची प्रातिनिधीक स्वरुपात टेस्ट केली जात आहे. मात्र यामध्ये अवघ्या एका दिवसात आठ जण पॉझिटिव्ह आढळल्याने आता यापुढे या कार्यालयात प्रवेश करणाऱ्या सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयातील एक कर्मचारी सध्या कोरोनाग्रस्त असून अतिदक्षता विभागात मृत्युशी झुंज देत आहे. पुढील काळात असे प्रकार होऊ नयेत यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

कर्मचारी,अधिकारी व आगंतुकांच्या सुरक्षेसाठी कार्यालयात विविध ठिकाणी स्पर्श विरहित सँनिटायझर पंप लावण्यात आले आहेत. त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने मास्क योग्य पध्दतीने परिधान करणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी केलेल्या तपासणीमध्ये एकाच दिवशी तब्बल आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने कर्मचारी धास्तावले आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.’ 
– रविंद्र गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

हेही वाचा – माझे कुटुंब, माझी जबाबदारीची ‘त्या’ चार राज्यांना गरज!