राम प्रसाद बिस्मिल यांचा आज स्मृतिदिन. राम प्रसाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये झाला. आजुबाजूच्या सामाजिक पुराणमतवादामुळे अस्वस्थ झालेले बिस्मिल हे अगदी लहान वयातच एक अतिशय श्रद्धाळू आर्य समाजी बनले आणि त्यांचे गुरू स्वामी सोमदेव यांच्या प्रभावाखाली ब्रिटिश साम्राज्यविरोधी संघर्षात ओढले गेले. स्वामी सोमदेव यांनी बिस्मिल यांना इटालियन देशभक्त मॅझीनी आणि इतर साथींच्या लिखाणाची ओळख करून दिली. बिस्मिल यांनी १९१६ च्या लखनौतील काँग्रेसच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि त्यांचा संपर्क मातृवेदी म्हणून ओळखल्या जाणार्या ब्रिटिशविरोधी भूमिगत क्रांतिकारक संघटनेशी झाला.
त्याच वर्षी त्यांनी ‘अमेरिका को स्वाधीनता कैसे मिली’ हे पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये त्यांनी एखाद्या देशाला प्रगत होण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य गरजेचे आहे आणि ते मिळविण्यासाठी सशस्त्र संघर्ष सर्वात जास्त व्यवहार्य पर्याय आहे, अशी भूमिका मांडली. १९१८ मध्ये त्यांनी ‘देशवासीयो के नाम संदेश’ हे पत्रक प्रकाशित केले ज्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र होऊन लढावे असे आवाहन केले. १९२० मध्ये त्यांनी ‘सुशील माला’ नावाने प्रकाशनगृह सुरू केले आणि ‘बोलशेविकों की करतूत’ प्रकाशित केले तसेच ‘मन की लहर’ कवितासंग्रह आणि कॅथरीन या रशियन समाजवादी क्रांतिकारक, कॅथरीन ब्रेशकोव्हस्की यांचे चरित्र प्रसिद्ध केले.
असहकार चळवळीच्या वेळी त्यांनी ‘स्वदेशी रंग’ नावाचा कवितासंग्रह छापला. ९ ऑगस्ट, १९२५ रोजी बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी लखनौजवळ काकोरी येथे रेल्वे थांबवून सरकारी तिजोरी लुटली. यातून मिळालेला निधी जर्मनीकडून शस्त्रे घेण्यासाठी वापरण्यात येणार होता. त्यानंतर बहुतेक एचआरए नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्यापैकी बिस्मिल यांच्यासह 4 जणांना १९ डिसेंबर १९२७ रोजी ब्रिटिशांनी फाशी दिली.