Aryan Khan Drug Case: किरण गोसावीच्या काळ्या धंद्याकडे पालघर, नवी मुंबई पोलिसांचे दुर्लक्ष

किरण याची केपीजी ड्रीम नावाचे कार्यालय नवी मुंबईत वाशी परिसरात आहे.

Aryan Khan Drug Case: Palghar, Navi Mumbai Police ignores Kiran Gosavi's black business
Aryan Khan Drug Case:

नार्कोटिक सेलच्या कारवाईत आर्यन खान याला अटक करण्यात पुढाकार असलेला किरण गोसावी याच्या सहाय्यीकेला झालेली अटक आणि त्यांच्या नवी मुंबईतील कार्यालयातून सुरू असलेली फसवणूक पुणे पोलिसांच्या रडावर असताना पालघर आणि नवी मुंबईच्या पोलिसांनी मात्र त्याच्या कारनाम्यांकडे पध्दतशीर डोळेझाक केल्याचे दिसून येते. बेरोजगारांकडून पैसे उकळण्याचे हे उद्योग गोसावीच्या नवी मुंबईतील कार्यालयातून होत होते. मात्र तरी याचा सुगावा पोलिसांना लागला नाही, याचे आश्चर्य व्यक्त होते आहे. शहारुख खान याच्या आर्यन या मुलाच्या कॉर्डेलिया या क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीदरम्यान टाकण्यात आलेल्या छाप्यात किरण गोसावी आणि कल्याण भाजपचा उपाध्यक्ष असलेल्या मनिष भानुशशली यांनी सहभाग घेतला होता. या दोघांच्या कारवाईतील सहभागामुळे नार्कोटिक सेलचे विभागीय संचालक चांगलेच अडचणीत आले आहेत. या दोघांचाही कारवाई संबंध नाही, असे जाहीररित्या सांगणार्‍या नार्कोटिक सेलच्या अधिकार्‍यांनी या दोघांवर काही एक कारवाई न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असताना नवी मुंबई पोलिसांनीही मनिषचा साथीदार असलेल्या किरण गोसावीच्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसू लागले आहे.

बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष

किरण याची केपीजी ड्रीम नावाचे कार्यालय नवी मुंबईत वाशी परिसरात आहे. या कार्यालयातून वेळोवेळी जाहिराती प्रसिध्द करत बेरोजगार तरुणांना नोकरीच्या बहाण्याने संपर्कित केले जाते. मलेशियात नोकर्‍या देण्याच्या खोट्या जाहिराती प्रसिध्द करून गोसावीच्या कंपनीने अनेकांना गंडा घातल्याची दोन प्रकरणे सध्या गाजत आहेत. यातील एक आहे पुण्यातील आणि दुसरे आहे. पालघरमधील केळवे पोलीस ठाण्यातील या दोन्ही पोलीस ठाण्यांना गोसावी हवा आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने तर गोसावीला अटक वॉरंट काढले होते, अशी माहिती मिळते. अशी गुन्हेगार व्यक्ती सिंघम अधिकारी समजल्या जाणार्‍या समीर वानखेडे यांच्या एनसीबीच्या कार्यालयात येरझार्‍या घालताना पाहून सर्वांनाच धक्का बसला.केळवे पोलीस ठाण्यात पालघरच्या उत्कर्ष तरे आणि आदर्श किणी या दोन बेरोजगार तरुणांनी गोसावीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अन् असंख्य तरुणांची फसवणूक नवी मुंबईत झाली….

२०१८मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास तिथले सहाय्यक निरीक्षक भिमसेन गायकवाड यांच्याकडे होते. मात्र आजवर या गुन्ह्याची साधी चौकशी त्या पोलिसांनी केली नाही. या दोघांचे पैसे गोसावीच्या नवी मुंबईच्या पत्यावर ऑनलाईन जमा करण्यात आले. अशा असंख्य तरुणांची फसवणूक नवी मुंबईत झाली. पण या पोलिसांनीही याची दखल घेतली नाही. उत्कर्ष आणि आदर्श यांच्याकडून मलेशियात नोकरीसाठी गोसावीने प्रत्येकी १ लाख ६५ हजार रुपये घेतले. त्यांना क्वाललांपूर येथे पाठवण्यात आल्यावर त्यांची विमानाची तिकीट आणि पासपोर्ट खोटा असल्याचे आढळून आले. आता पुणे पोलिसांनी फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला केली आहे. शेरबानो कुरेशी असे या महिला सहाय्यकाचे नाव आहे.

पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची २०१८ मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे, किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथके कार्यरत झाली आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे.

फेसबुकवरुन ओळख

नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीचे रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले. ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरायचा

गोसावीची के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याने त्याच्या काळ्या कृत्यांकडे स्थानिक पोलिसांनी सातत्याने दुर्लक्ष केले. खासगी गुप्तहेर अशीही गोसावीने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरायचा. उठबस मोठ्या अधिकार्‍यांशी असल्याने त्याचे सगळे गुन्हे दुर्लक्षित झाले.


हे ही वाचा – Cruise Drug Case : पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटी NCB च्या रडारवर, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका