घरताज्या घडामोडीप्रशासनातील काही अधिकार्‍यांनी मागच्या सरकारच्या पक्षाला वाहून घेतले - अशोक चव्हाण

प्रशासनातील काही अधिकार्‍यांनी मागच्या सरकारच्या पक्षाला वाहून घेतले – अशोक चव्हाण

Subscribe

प्रशासनातील अधिकार्‍यांनी आपले काम प्रामाणिकपणे करण्याची गरज असते. मात्र, मागच्या सरकारमध्ये काही अधिकार्‍यांनी एका पक्षाचे कार्यकर्ते होऊन काम केले होते, जे चुकीचे होते. राज्यात सरकार येत असतात आणि जातात. मात्र, प्रशासकीय अधिकार्‍यांनी एखाद्या राजकीय पक्षाला वाहून घेऊ नये. मागच्या सरकारमध्ये अधिकारी आणि सरकारचे जे समीकरण बनले, ते राज्यासाठी घातक आहे, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती बदलणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांचा रोख भाजप पक्षाला मदत करणार्‍या अधिकार्‍यांकडे होता.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल ‘मायमहानगर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत असताना अशोक चव्हाण यांनी सरकारच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा कुठलाही अनुभव नव्हता. मात्र, तरीही त्यांनी चाणाक्षपणे राज्याचा कारभार हाकण्याचा प्रयत्न केला आहे. एखादी गोष्ट माहीत नसल्यास ती समजून घेऊन त्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न ठाकरे करत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री फिरत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, तो काही खरा नाही. देशाचे पंतप्रधान देखील कोरोना काळात बाहेर फिरलेले नाहीत. कोरोनाच्या काही मर्यादा आहेत, त्या पाळूनच काम करावे लागेल, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

देशातील अनेक नेत्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल असतील किंवा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे कोरोनामुळे निधन झालेले आहे. तर माझ्यासहीत अनेक मंत्र्यांना, नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे विरोधकांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. निदान कोरोनाचे तरी त्यांनी राजकारण करू नये, अशी खंत चव्हाण यांनी बोलून दाखवली.

स्वतः मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले. “मुख्यमंत्रिपद हे हॉटसीटसारखे असते. पहिले सहा महिने हे हानिमून पिरियडसारखे असतात. या सहा महिन्यांत मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका होत नाही. त्यानंतर सरकारवर टीका केली जाते. मात्र, भाजपने पहिल्या दिवसांपासूनच सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आपल्याकडून सत्ता गेली आहे, हे सत्य भाजपला अद्याप पचवता आलेले नाही.”, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्षाला किंवा शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. शिवसेना आपले हिंदुत्व कायम ठेवून काम करत आहे. तर काँग्रेसने आपली धर्मनिरपेक्ष विचारधारा जोपासून काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे कोणतेही नुकसान नाही, अशी ठाम भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मायमहानगरच्या खुल्लमखुल्ला मुलाखतीत व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -