घरठाणेपुरग्रस्तांच्या मदतीला बदलापूरवासीय धावले

पुरग्रस्तांच्या मदतीला बदलापूरवासीय धावले

Subscribe

सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा पुढाकार,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी बदलापूरकर ग्रुप, रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आदींच्या माध्यमातून बदलापूरकरांनी जीवनावश्यक वस्तू कोकणवासीयांना मदत म्हणून दिल्या आहेत

काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणाला पुराचा जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशा परिस्थितीत कोकणातील बांधवांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. बदलापुरातूनही हजारो नागरिकांनी यथाशक्ती मदतीचा हात दिला असून स्वतः पूरग्रस्त असताना बदलापूरकरांनी जपलेल्या या माणुसकीचे कौतुक होत आहे.

आठ-दहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर, तसेच चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.  या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणहून मदतीचे हात पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणाही बचाव व मदत कार्य करीत आहे. परंतु पुराचा फटका प्रचंड असल्याने ही मदतही अपुरी पडत आहे..याच विचारातून बदलापुरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून कोकणवासीयांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याच कालावधीत बदलापूरलाही पुराचा फटका बसला होता. त्यामुळे या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल,याबाबत साशंकता होती. परंतु आपल्या दुःखापेक्षा कोकणवासियांचे दुःख निश्चितच अधिक आहे हे लक्षात घेऊन बदलापूरकरांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण वासीयांना मदतीचा हात दिला आहे. याबद्दल कोकणवासीयांना मदत घेऊन जाणाऱ्या सर्वच सामाजिक राजकीय-कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी सहकार्य करून सर्वसामान्य बदलापूरकरांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचा पुढाकार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मी बदलापूरकर ग्रुप, रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आदींच्या माध्यमातून बदलापूरकरांनी तांदूळ, डाळ अशा अन्नधान्याबरोबरच पीठ,मीठ,तेल,साखर, चहापावडर, कपडे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, सॅनिटरी नॅपकिन, टुथपेस्ट, टूथब्रश, बिस्कीट अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू कोकणवासीयांना मदत म्हणून दिल्या आहेत.त्याशिवाय डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन बदलापूरातील ७७५ श्री सदस्यांची श्रमदान केले आहे.

मनसे आणखी मदत फेरी पाठवणार

मनसेचे जिल्हा संघटक उमेश तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत पाठविली होती. त्यानंतर शनिवारी पहाटे मनसे शहराध्यक्ष जयेश कदम व त्यांच्या सहकाऱयांनीही मदत साहित्याचा टेम्पो कोकणात रवाना केला आहे. लवकरच  मदतीची आणखी एक फेरी पाठवण्यात येणार असल्याचे जयेश कदम यांनी सांगितले. तर कोकणात मनसेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून त्यासाठी बदलापूरातील मनसेची टीम लवकरच रवाना होणार असल्याचे मनसेचे शहर सचिव भाई जाधव यांनी सांगितले.

- Advertisement -

कोल्हापूरला दिला होता मदतीचा हात

दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतीतही बदलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिखली गावातील ३०० कुटुंबाना दैनंदिन गरजेच्या वस्तू देऊन मदतीचा हात दिला होता. याच मंडळींनी यंदा मी बदलापूरकर ग्रुपच्या माध्यमातून कोकणवासीयांना मदतीचा हात दिला आहे.


हेही वाचा – Maharashtra Unlock: दुकानदारांना दिलासा! हॉटेल्स, रेस्टॉरंटचे नियम जैसे थे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -