घरताज्या घडामोडीखानदेशातील केळी रायगडच्या मातीत बहरली

खानदेशातील केळी रायगडच्या मातीत बहरली

Subscribe

अतिवृष्टी, वादळ, वारा सर्व सहन करीत केळी पीक डौलाने उभे असून, हमखास उत्पन्न मिळवून देणारे हे पीक रायगडची उरली सुरली शेती टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरणार आहे.

रायगड जिल्ह्याचे हवामान, पाणी आणि मातीशी जुळवून घेत खानदेशात भरघोस उत्पादन देणार केळी या मातीत बहरली असून, केळीची यशस्वी लागवड शेती आणि शेतकर्‍यांना नवी दिशा देणार आहे. औद्योगिकरण माथी आपटण्यापूर्वी रायगड (तत्कालीन कुलाबा) जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे. परंतु औद्योगिकीकरणामुळे ही ओळख देखील पुसू लागली आहे. त्यातच जमीनीला आलेला सोन्याचा भाव पाहून जमिनी विकण्याचा सपाटा सुरू आहे. शेतीबरोबर शेतकरी नामशेष होत असताना तालुक्यातील युवा आणि होतकरू शेतकर्‍यांनी केळी लागवडीचा केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी आणि उत्पन्न मिळवून देणारा ठरला आहे. दीड वर्षांपूर्वी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सुखकर्ता शेतकरी सेवा सहकारी संस्थे (मर्यादित) ची स्थापना करून वावंढळ येथील जयंती सोमाणी यांच्या ओसाड, पडिक १० एकर शेतीत एकत्रित केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे.

यामध्ये साधारणतः १५ लाखांची गुंतवणूक करण्यात आली. सुमारे १० हजार रोपांची लागवड एप्रिल २०२० मध्ये करण्यात आली होती.’जी-नाईन’ जातीची ही रोपे आहेत. अवघ्या ७ महिन्यांतच मेहनतीचे फळ दिसू लागले असून, केळीला फुटवा (लोंगर) लागला आहे. खानदेशात हाच कालावधी ९ महिने ते वर्षभरात असल्याने रायगडच्या मातीत ‘जी-नाईन’ चांगल्या पद्धतीने रुजली आणि बहरल्याचे सिद्ध झाले. शेतकर्‍यांनीसुद्धा लाड कौतुक करीत ओटीभरण कार्यक्रम केला. पहिला घड जवळपास २५ किलोचा निघाला. दुसर्‍या वर्षातही चांगल्या पद्धतीने पीक आले आहे.

- Advertisement -

अतिवृष्टी, वादळ, वारा सर्व सहन करीत केळी पीक डौलाने उभे असून, हमखास उत्पन्न मिळवून देणारे हे पीक रायगडची उरली सुरली शेती टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत कमी क्षेत्रात केळीची लागवड होत असल्यामुळे बाजारपेठ मिळत नव्हती. एकत्रित पद्धतीने केळी लागवड केल्याने बाजारपेठेचा प्रश्न मिटला असून, केळी पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर तयार करण्यात आले असल्याने स्थानिक बाजारपेठ आणि व्यापारी यांच्यावर लक्ष केंद्रित होणार आहे.

सुखकर्ता शेतकरी संस्थेच्या माध्यमातून सुभाष मुंढे, प्रमोद पवार, बाळकृष्ण लबडे, दिनेश शिंदे, सुनील कुरुंगले, आविनाश आमले, जयंतीभाई सोमाणी, संतोष दळवी, राजेश मोरे, अविनाश बुरुमकर, समीर पिंगळे, भरत साळुंके आदी शेतकरी एकत्र आले आहेत. येथेच केळी पिकविण्यासाठी प्लांट तयार करण्यात आला आहे. तालुक्यात केळी लागवड करणार्‍या शेतकर्‍यांची केळी देखील ‘सुखकर्ता’ खरेदी करणार असल्याने शेतकर्‍यांना तालुक्यात हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. तालुक्यात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी केळी लागवडीकडे वळावे यासाठी देखील ‘सुखकर्ता’ प्रयत्न करणार आहे.

- Advertisement -

                                                                                        -मनोज कळमकर


हे ही वाचा – कोस्टल रोड प्रकल्पात १ हजार कोटींचा घोटाळा; भाजपचा शिवसेनेवर गंभीर आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -