घरताज्या घडामोडीही माझी शेवटची निवडणूक! नितीशकुमारांनी दिले निवृत्तीचे संकेत

ही माझी शेवटची निवडणूक! नितीशकुमारांनी दिले निवृत्तीचे संकेत

Subscribe

बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नितीशकुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचीच घोषणा केल्याची चर्चा आता राष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. धमदाहामधील आपल्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना नितीशकुमार यांनी ही घोषणा केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी थंडावला. यावेळी धमदाहामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या नितीशकुमार यांनी जाहीर सभेत राजकीय संन्यासाची घोषणाच करून टाकली. आज तिसर्‍या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला, असं वक्तव्य नितीशकुमार यांनी केले.

- Advertisement -

नितीशकुमार यांची राजकीय वाटचाल
नितीशकुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीशकुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 साली बिहारमध्ये नितीशकुमार एनडीएची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.

नितीशकुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

- Advertisement -

बिहार विधानसभा निवडणूक प्रचार थंडावला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. जेडीयूचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी जोरदार प्रचार केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. या ठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -