पनवेल मनपा उपमहापौरपदी भाजपच्या सीता पाटील यांचा विजय

bjp Sita Patil won as Deputy Mayor of Panvel Corporation
पनवेल मनपा उपमहापौरपदी भाजपच्या सीता पाटील यांचा विजय

पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सीता सदानंद पाटील विरुद्ध शेकापच्या प्रीती जॉर्ज यांच्या लढत झाली. यामध्ये सीता पाटील यांना ५० मते तर प्रीती जॉर्ज यांना २७ मते मिळाली असून बहुमताने सीता पाटील या उपमहापौरपदी विजयी झाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजल्यापासून शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवारांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी ऑनलाईन मतदान केले गेले.

सर्वप्रथम उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली असून भाजप नगरसेविका सीता पाटील या उपमहापौरपदी सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सीता पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रथमच उपमहापौरपदाची जबाबदारी मिळाल्याने सीता पाटील यावेळी भावुक झाल्या.

उपमहापौर पदासाठी सीता पाटील यांनी भाजपमधून आणि प्रिती जॉर्ज यांनी शेकापमधून अर्ज भरला होता. सदर पदासाठी दोन उमेदवार असल्याने मतदान घेऊन निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये सीता पाटील यांना ५० मते तर प्रिती जॉर्ज यांना २७मते पडली. २३मते अधिक मिळवून सीता पाटील यांची उपमहापौर पदी निवड झाली. तसेच स्थायी समिती सभापतीपदी नरेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. महिला बालकल्याण सभापतीपदी हर्षदा उपाध्याय यांची बिनविरोध निवड झाली.

प्रभाग समिती ‘अ’च्या सभापतीपदी संजना कदम यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती ‘ब’च्या सभापतीपदी प्रमिला पाटील आणि प्रिया भोईर यांनी अर्ज केला होता. सदर पदासाठी दोन उमेदवार असल्याने मतदान प्रक्रिया घेऊन सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रमिला पाटील यांना १३ मते आणि प्रिया भोईर यांना ७ मते मिळाली. सहा मते अधिक मिळवून सभापती पदी प्रमिला पाटील यांची निवड झाली. प्रभाग समिती ‘क’च्या सभापतीपदी अरुणा भगत यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती ‘ड’ सभापतीपदी वृषाली वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.


हेही वाचा – शासनाच्या जाचक अटींमुळे रायगड जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर