केंद्रीय गृह मंत्रालयाने मद्य विकण्यास परवानगी दिल्यानंतर तळीरामांची मद्याच्या दुकानाबाहेर एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्रकच त्यांनी आज जारी केले आहे. लॉक डाऊन मधून दारूचे दुकान (वाईन शॉप) यांना वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोमवारपासून मुंबईत वाईन शॉप सुरू झाले. मात्र वाईन शॉप वर उसळलेली तळीरामांची गर्दी लक्षात घेऊन, पालिका आयुक्तांनी मुंबईत पुन्हा दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबई दारू मिळणार नाही.
कोरोनाच्या संसर्गमुळे गेल्या ५० दिवसापासून मुंबईतील वाईन शॉप, बार, बिअर शॉपी पूर्णपणे बंद होते. पण वाईन शॉप सुरु करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी मागणी केली. देशाचा व राज्याचा करोडो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे कारण देत अनेकांनी वाईन शॉप सुरू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. अखेर सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह वाईन शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी काही अटी सापेक्ष मुंबईत वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सोमवारपासून वाईन शॉप सुरू झाले. पण तळीराम यांनी प्रचंड मोठ्या रांगा लावत नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली.

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या मुलुंड, घाटकोपर, अंधेरी, भागात अनेक वाईन शॉप समोर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचा खेळखंडोबा झाला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री अचानक पालिका आयुक्त यांनी मुंबईतील वाईन शॉप पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारपासून मुंबईत पुन्हा दारूबंदी लागू होणार आहे. वाईन शॉप सुरू करायचे की नाही, याचा सर्वस्वी अधिकार महापालिका आयुक्तांचा आहे.
जीवनावश्यक दुकाने सुरू राहणार
मुंबई कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकान वगळता, अन्य सर्व दुकान बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मेडिकल स्टोअर, भाजी मार्केट खुले राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना शिवाय अन्य दुकाने उघडणार नाहीत, याची विभागातील सहाय्यक आयुक्तांनी काळजी घ्यावी. वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.