बोईसरमध्ये कंपनीतील दोन गटात तुफान दगडफेक, १० पोलिसांसह कामगार जखमी

Boisar viraj group of compay workers stones pelting 10 policemen and workers injured
बोईसरमध्ये कंपनीतील दोन गटात तुफान दगडफेक, १० पोलिसांसह कामगार जखमी

विराज ग्रुपच्या तारापूर येथील विविध प्लांटमध्ये सुमारे १० हजार कामगार काम करीत असून १६ मे पासून मुंबई लेबर युनियनने बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे कारखान्यातील वातावरण काही दिवसांपासून गंभीर असल्याचे समजते. शनिवारी अचानक उफाळलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये कारखान्यातील मालमत्तेचे व कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करण्यात आले असून पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही कामगार जखमी झाल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. परंतु यामध्ये निश्चित किती कामगार जखमी झाले ते समजले नाही. तर जखमी पोलिसांना तुंगा रुग्णालयात दाखल केले असून जखमी पोलिसांची संख्या वाढण्याची शक्यता एका पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

“युनियनयचे सभासद असलेले कायमस्वरूपी कामगार, १०० हून अधिक खाजगी कामगार व कंपनीचे जवळपास १५० बाऊंसर यांच्यात झालेल्या संघर्षात ७०-८० कामगार आणि १६ पोलीस कर्मचारी जखमी” झाले आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे. विराज प्रोफईल लि. या कारखान्यात मागील वर्ष भरापासून मुंबई लेबर युनियन व कंपनी व्यवस्थापनाने स्थापन केलेली युनियन यात मुंबई लेबर युनियनचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने स्थापन केलेल्या युनियनचे सदस्य होण्यासाठी दबाव आणला जात होता. यातून अनेक वेळा संघर्ष ही झाला होता. परंतु दुपारी कंपनी व्यवस्थापनाने मुंबई लेबर युनियनच्या कामगारांना जबरदस्तीने कंपनीच्या बाहेर काढून काही गावगुंडांच्या मदतीने कंत्राटी कामगारांची नेमणूक केल्याने संतप्त कामगार व जावळपास १५० बाऊँसर, १०० हून अधिक कामगार म्हणून आणलेले यांच्यात दुपारी तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यात जवळपास ७० ते ८० कामगार व १६ पोलीस जखमी झाले आहेत. तर तीन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

मागील ३० ते ३५ वर्षांपासून कामगारांची अर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्या विराज प्रोफाइल कारखान्यात व्यवस्थापन व कामगारांचा वाद शिगेला पोचला आहे. कंपनी व्यवस्थापनाने स्वतःची कामगार संघटना स्थापन करत मुंबई लेबर युनियनचे सदस्य असलेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाच्या युनियने सदसत्व घेण्यासाठी दबाव वाढवत कंपनीतून बाहेर काढल्याने सुरू झालेल्या वादातून पटलेल्या संघर्षात कारखान्यात कामगारानी आक्रमक होत तुफान दगडफेक केली. या गंभीर घटनेत ७० ते ८० कामगारांना मारहाण करण्यात आली असुन या संघर्षादरम्यान १६ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. जखमी कामगार व पोलीसांवर बोइसर येथिल शासकीय रुग्णालयात व तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटने नंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला जेलमध्ये दिलेली वागणूक गंभीर, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा