व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवर प्रियकराचा चाकूने हल्ला

व्हॅलेंटाईन दिनीच विवाहित प्रेयसीवर तिच्या प्रियकरानेच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना परळ परिसरात घडली. जखमी महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून भोईवाडा पोलिसांनी आरोपी प्रियकर राजेश काळे याला अटक केली आहे. त्याला सोमवारी भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

ही घटना रविवारी दुपारी पावणेतीन वाजता परळ येथील बाटलीवाला रोड, केईएम रुग्णालयाजवळ घडली. 37 वर्षांची ही महिला गोवंडी परिसरात राहते. ती सध्या केईएम रुग्णालयात कोरोना केअर सेंटरमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कामाला आहे. दुपारी पावणेतीन वाजता ती केईएम रुग्णालयाजवळ उभी होती. तिचा परिचित राजेश काळे हा तिथे आला. जुन्या प्रेमसंबंधातून त्यांच्यात वाद आणि नंतर शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा संतापलेल्या राजेशने तिच्यावर चाकूने वार केले. तिच्या पोटात गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणारा प्रियकर राजेश काळे याला पेलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सोमवारी त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलीस तपासात राजेश हा कुर्ला येथील कुर्ला सिग्नल ब्रिजजवळ राहतो. त्याचे या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकल्याचे बोलले जाते. याच जुन्या प्रेमसंबंधातून त्याने तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जाते.