घरताज्या घडामोडीनिर्दयीपणा : फ्लेमिंगोंच्या थव्यांना हुसकावण्यासाठी फोडले फटाके

निर्दयीपणा : फ्लेमिंगोंच्या थव्यांना हुसकावण्यासाठी फोडले फटाके

Subscribe

पक्षी मित्रांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे तक्रार

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि जैव विविधतेने नटलेल्या पाणजे पाणथळीत सातत्याने येऊ लागलेल्या स्थलांतरीत फ्लेमिंगोंना हुसकारवण्याचा निर्दयीपणा विकसकांकडून केला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. हे क्षेत्र नवी मुंबई एसईझेडमध्ये नोंदवले गेले असल्याने फ्लेमिंगोंमुळे विकास कामांना खिळ बसत असल्याचे निमित्त करत विकासकांसाठी काम करणारे समाजकंटक उघडपणे पानथळीत फटाके फोडून फ्लेमिंगोंच्या थव्यांना हुसकावत असल्याचे उघड झाले आहे. हे उद्योग थांबवण्यासाठी हे क्षेत्र राखीव ठेवण्याची मागणी पक्षपे्रमींनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उरणपासून जवळच असलेले पाणजे पाणथळ हे स्थलांतरीत फ्लेमिंगोंसह सीगल या पक्षांचे आश्रयस्थान आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या पाणथळीत लाखो पक्षी येत असतात. ही पाणथळीचा जागा एनएमएसईझेडच्या ताब्यात असून पर्यावरणवाद्याच्या विरोधामुळे येथे विकासकामे करता येत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे काही समाजकंटक या परिसरात येणार्‍या पक्षांना हुसकावून लावण्यासाठी या पक्षांचा पाठलाग करत फटाके फोडत आहेत.

- Advertisement -

तर काहीजण जाणून बूजून या पाणथळीतील खारफूटी तोडून त्यांची नासधुस करत आहेत. या समाजकंटकांवर कारवाई करावी यासाठी पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली आहे. एनएमएसईझेडच्या ताब्यात असलेल्या पाणजे गावाजवळील ३०० हेक्टर जागा ही पाणथळीची आहे. या पाणथळीत परिसरात सुमारे दीड लाखांहून अधिक स्थलांतरीत आणि स्थानिक पक्षांचे आश्रयस्थान आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेले हे क्षेत्र गेल्या अनेक वर्षांपासून पक्षांच्या रहिवासाचे ठिकाण असताना सिडकोने या क्षेत्रावर नवी मुंबई सेझ प्रकल्प आरक्षित केला आहे. हे सध्या रिलायन्सच्या ताब्यात आहे. पक्षांचा रहिवास उघड असताना सिडकोने हे वाटप केलेच कसे, असा सवाल केला जात आहे.

आपला फायदा व्हावा यासाठी सिडको आणि ज्यांना हे क्षेत्र देण्यात आले आहे, त्यांच्याकडूनच पक्षी हटावाची छुपी मोहीम राबवली जात असल्याचे पर्यावरणवाद्यांनी निदर्शनात आणले आहे. कांदळवन नष्ट करत त्या ठिकाणी काँक्रिटचे जंगल निर्माण करण्याचा छुपा डाव असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे. त्या अनुषंगानेच काही व्यक्ती आणि संस्थांनी येथे येणार्‍या पक्षांना हुसकावण्याची जबाबदारीच काहींवर दिल्याचे सांगण्यात आले. फटाके वाजवून पक्षांना हुसकावले जात असल्याचे व्हिडिओही काही पक्षीपे्रमींनी मुख्यमंत्र्यांच्या माहितीसाठी पाठवले आहेत. या व्हिडिओत फटाके वाजवल्यामुळे अनेक पक्षी अस्तव्यस्त झालेले तर काही जखमी झालेलेही दिसतात. नॅटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने समाजकंटकांच्या या उद्योगाची माहिती गोळा करून मोहीम सुरू केली आहे. फाऊंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी याला दुजोरा दिला.
बी.एन.कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारी अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करताना खाफुटी आणि पाणथळी नष्ट करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरून कारवाई व्हावी, अशीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.एनएमएसईझेडकडून सातत्याने नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. एमसीझेडएमएने पर्यावरण संचालक नरेंद्र टोके यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. या परिसरातील खारफुटी नष्ट करण्यासाठी परिसरातील होल्डींग पाँड्स बंद करण्यात आले आहेत. पर्यावरणप्रेमींना येथे फोटो काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या येथे स्थलांतरीत पक्षांचे आगमन सूरू झाले आहे. हे अगमन सुरू झाल्यापासून फटाके लावण्याची निर्दयी कृती सुरू झाली आहे. या क्षेत्रात नवी मुंबई सेझच्या वतीने सुरक्षा केबीन उभारण्यात येऊन यातूनच हे उद्योग केले जात असल्याचा आरोप केला जातो आहे.

तहसिल आणि पोलीस निद्रेत 

फ्लेमिंगो, सीगल सारख्या स्थलांतरीत पक्षांच्या आश्रयाच्या पाणजे येथील पाणथळींवर फटाके लावण्याच्या कृतीची माहिती पक्षीप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी वेळोवेळी दिली. याशिवाय उरण पोलिसांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोन्ही ठिकाणी अधिकारी निद्रेत असल्याचा अनुभव पक्षीप्रेमींना आला आहे.

-राजकुमार भगत 


हे ही वाचा – Covid-19 Vaccination : ‘या’ दिवशी कुणालाही मिळणार नाही लसीचा पहिला डोस


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -