घरताज्या घडामोडीCDS- संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

CDS- संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

Subscribe

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी लष्कराच्या Mi-17V5 या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेत CDS संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत पत्नी आणि काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह प्रवास करत होते. हेलिकॉप्टरमध्ये क्रू मेंबर्ससह एकूण १४ जण होते. भारतीय  वायूसेनेने बिपीन रावत यांच्यासह अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती टि्वटद्वारे दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेत कॅप्टन वरूण सिंग हे बचावले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हे हेलिकॉप्टर दिल्लीतील सुलूर लष्करी बेसवरून वेलिंग्टनला निघाले होते. “CDS बिपीन रावत यांचे बुधवारी दुपारी कून्नूर येथील वेलिंग्टन सशस्त्र महाविद्यालयात लेक्चर होते. मात्र याचदरम्यान हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला आणि ते कुन्नूर येथील जंगलात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळताच मोठा आवाज झाला आणि हेलिकॉप्टरमधून आगीचे लोळ आकाशात झेपावू लागले. हेलिकॉप्टरमधून बाहेर पडण्यासाठी कोणालाही वेळ मिळाला नाही. आगीच्या ज्वाळा बघून स्थानिकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. मात्र पोलीस आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीने हेलिकॉप्टरला चारही बाजूंनी वेढलेले होते. त्यानंतर अग्नीशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी ३ मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. यातील सगळेजण आगीत ८५ टक्क्याहून अधिक प्रमाणात होरपळलेले होते. यात रावत यांचादेखील समावेश होता. या सगळ्यांना वेलि्ंग्टन लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रावत हे देखील उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे रावत यातून नक्कीच बचावतील अशी सर्वांनाच आशा होती. विशेष म्हणजे हेलिकॉप्टर लँडींग स्पॉटपासून अवघे १० किलोमीटरवर असताना ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. त्यानंतर सिंह यांनी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. नंतर राजनाथ सिंह रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी रावत यांच्या कुटुंबीयांना ही दु:खद बातमी देत त्यांचे सांत्वन केले.

- Advertisement -

तर दुसरीकडे हेलिकॉप्टर दुर्घटनेचे वृत्त कळताच लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे देखील तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

या आधीही हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावले होते रावत
३ फेब्रुवारी २०१५ मध्ये बिपीन रावत चीता हेलिकॉप्टरमधून जात असताना ते नागालँड येथील दीमापूरमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले होते. पण त्यातून रावत सुखरूप बचावले होते. त्यावेळी रावत लेफ्टनंट जनरल होते.

कोण होते बिपीन रावत

बिपीन रावत हे देशातील पहीले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असून हवाई दल,लष्कर आणि नौदल या तिन्ही दलात समन्वय साधणे हे त्यांचे काम होते. २०१९ मध्ये त्यांनी चीफ ऑफ डिफेन्सचा पदभार हातात घेतला होता.

बिपीन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. रावत यांना देशप्रमाचे बाळकडू त्यांच्या घरातून मिळाले. त्याचे वडील एलएस रावत हे लष्करात लेफ्टनंट जनरल होते. कडकशिस्तीबरोबरच अचूक धडाकेबाज निर्णय ही रावत यांची जमेची बाजू आहे. अनेकवेळा त्यांनी चीन आणि पाकिस्तानला खडे बोलही सुनावले असून अॅक्शनही घेतल्या. यामुळे चीन आणि पाकिस्तानही रावत यांच्यापासून सावध राहतात. बिपिन रावत यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आले होते.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -