कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईत ढगाळ वातावरण

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेला पुढे सरकत असून, मुंबई आणखी दोन दिवस वातावरण ढगाळ असणार आहे. तर उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यांचा प्रभाव म्हणून उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. ११, १२ आणि १३ डिसेंबर या कालावधीत धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे बुधवारी मुंबई किंचित ढगाळ होती. गुरुवारी मात्र यात आणखी भर पडली. परिणामी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. तापमानातदेखील चढ उतार जाणवला. गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. विशेषत: मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३6 अंश होते. देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे.

दुसरीकडे राज्याच्या वातावरणातही उल्लेखनीय बदल होत असून, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि पालघरमधील कमाल तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.