चिरनेर जंगल सत्याग्रह : हुतात्मा दिनावर यंदाही कोरोनाचं सावट

हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष चिर्लेकर यांनी दिली आहे.

Chirner Jungle Satyagraha Martyr's Day
चिरनेर जंगल सत्याग्रह : हुतात्मा दिनावर यंदाही कोरोनाचं सावट

देशाच्या स्वातंत्र्यासाठी उरण तालुक्यातील चिरनेर येथे २५ सप्टेंबर १९३० रोजी आक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या शूरवीर हुतात्म्यांच्या स्मूतीदिन कार्यक्रमावर मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष चिर्लेकर यांनी दिली आहे.

या रणसंग्रामात धाकू गवत्या फोफेकर, नाग्या महादू कातकरी (दोघेही चिरनेर), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठीजुई), मोरेश्वर रघुनाथ शिंदे(कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे) आणि हसुराम बुद्धाजी घरत (खोपटे) या आठ शूरविरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात आक्कादेवीच्या माळरानावर जंगल सत्याग्रह केला. रायगड जिल्हा परिषद आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा आणि स्वातंत्र्य सैनिक आणि जखमींच्या नातेवाईकांचा यथोचित सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतो.

मात्र यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असला तरी शासनाच्या निर्बंधांचे पालन करीत अधिक गर्दी न करता हुतात्मा स्तंभ आणि शिलालेख यांनी पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून पोलिसांची शासकीय सलामी असा कार्यक्रम कोणताही गाजावाजा न करता पार पाडला जाईल, असे चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष चिर्लेकर यांनी स्पष्ट केले.

…अन् चिरनेर जंगल सत्याग्रह झाला

२५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज राजवटीत इंग्रजांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातल्या चिरनेर परिसरातील चिरनेरसह, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे आदी गावातील हक्काच्या जंगलावरील लाकडे तोडण्यास गावकऱ्यांना विरोध केल्याने गावातील शेतकरी, कातकरी वर्गाने अवजारे हातात घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. यासाठी लोक घरांतून रस्त्यावर आले होते. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली, त्या चळवळीला पाठिंबा देत उरणमधील शेतकऱ्यांनीही आपल्या जिवाची पर्वा न करता सत्याग्रह करुन इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता. यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामुळे व मारहाणीमुळे या वीरपुरुषांना जीव गमवावा लागला.


हे ही वाचा – Navi Mumbai International Airport : बीएनएचएसच्या अहवालात पाणथळातल्या पक्ष्यांना धोका असल्याचे गंभीर निष्कर्ष