घरताज्या घडामोडीसिडकोवर भूमिपुत्रांच्या फसवणुकीचा आरोप

सिडकोवर भूमिपुत्रांच्या फसवणुकीचा आरोप

Subscribe

घरे उठविल्यानंतर १८ महिन्यांचे घरभाडे देण्याचे सिडकोने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात बारा महिन्यांचे घरभाडे देण्यात आले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या आमिषाला बळी पडून सुपीक जमीन आणि सुस्थितीत असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंज्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोने योजना दाखवून तोंडाला पाने पुसल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला असून, बुधवारी या संदर्भात कोल्ही-कोपर येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी झालेल्या फसवणुकीचा पाढा वाचला.
यावेळी पंच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. घरे उठविल्यानंतर १८ महिन्यांचे घरभाडे देण्याचे सिडकोने मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात बारा महिन्यांचे घरभाडे देण्यात आले असून, साडेचार वर्षे उलटूनही अनेक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त भाड्याच्या घरात राहत आहेत. सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि पत्रव्यवहार करूनही सिडकोकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. गावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता त्याला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून, मैदानासाठी राखीव असलेला भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्यात आलेला आहे. तसेच सिडकोने अनेक नागरी सोयी सुविधा देण्यासंदर्भात दिलेली आश्वासने हवेतच विरली असल्याचे या भूमिपुत्रांनी सांगितले.

कोल्ही-कोपर हे गाव नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित झाल्याने वडघर, करंजाडे, पुष्पकनगर नोड येथे जागा देण्यात आली आहे. त्यामुळे गावाचे नावच नकाशावरून पुसले गेले आहे. त्यामुळे गावाची ओळख कायम राहण्यासाठी या विभागाला गावाची मूळ नावे देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आली. देवस्थानच्या भूखंडाच्या नावाखाली गावातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचा बराच हिस्सा सिडकोकडून लाटला गेला असून, याबाबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अर्ज केला असता तेथून श्री लक्ष्मी-नारायण देवस्थान ट्रस्ट मु. कोल्ही, ता. पनवेल, जि. रायगड या नावाने कोणतीही नोंद नसल्याचे पत्र देण्यात आले आहे.

- Advertisement -

यामुळे कोल्ही-कोपर ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, सिडकोने पोलीस बळाचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर निकराने लढा दिला जाईल, तसेच वेळप्रसंगी सिडकोची कामे बंद पाडण्यात येतील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.


हे ही वाचा – Rain Update: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, कोकणासह, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -