वातावरणातील बदलामुळे मच्छी रुसली : शेकडो बोटी किनार्‍यावर

Climate change kills fish: hundreds of boats ashore,
वातावरणातील बदलामुळे मच्छी रुसली : शेकडो बोटी किनार्‍यावर

महाराष्ट्रात सर्वाधिक मच्छीमारांची संख्या असलेल्या या तालुक्यातील मच्छीमारांवर सध्या अर्थिक संकट ओढवले आहे. १ ऑगस्ट रोजी मच्छीमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून सतत खराब हवामान आणि वारंवार येणारी चक्रीवादळे यामुळे समुद्रात मासे अतिशय कमी प्रमाणात मिळत आहेत. मिळणार्‍या मच्छीच्या विक्रीतून मच्छीमारीसाठी जाणार्‍या बोटींचा डिझेल आणि इतर खर्च देखील निघत नसल्याने शेकडो बोटी किनार्‍यावर लागल्या आहेत.

तालुक्याला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्या अनुषंगाने करंजा, मोरा, दिघोडे, खोपटे, आवरे, गोवठणे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी समुद्र किनार्‍यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय केला जातो. एकट्या करंजा गावात सुमारे ११०० यांत्रिक नौका असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. मात्र यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मच्छीमारीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रातून मच्छीमारी न करताच परतावे लागले आहे. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. ट्रॉलर किंवा पर्सोनेट नौकेला मच्छीमारीला जाताना साधारणपणे २ लाख रुपये खर्च येतो. डिझेल, बर्फ, खलाशांची मजुरी आणि त्यांचा जेवण-खाण्याचा खर्च अशा प्रकारचा हा खर्च असतो.

मात्र मच्छीमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून नौका वादळ आणि खराब हवामान यामुळे अनेक वेळा परत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा झालेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे सध्या प्रत्येक नौका मालकावर १० ते १२ लाखाचे कर्ज झाले आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने या मच्छीमारांना डिझेलचा परतावा दिला नसल्यामुळे तो मोठ्या अर्थिक अडचणीत सापडला आहे. मच्छीमार अडचणीत सापडल्यामुळे त्या व्यवसायावर आधारित खलाशी, मच्छी विक्रेते, टेम्पोचालक, जाळी आणि साहित्य विक्री करणार्‍यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत.

उरण तालुक्यात मच्छीमारांसाठी लॅण्डींग पॉइंट चांगला असल्यामुळे आणि मुंबईसारखी बाजारपेठ जवळ असल्यामुळे व्यवसाय चांगला फोफावला आहे. मात्र गेल्या वर्षापासून सतत येणारी वादळे आणि खराब हवामान यामुळे मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. मासेमारीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही. नफा सोडून द्या, पण खर्चही निघत नसल्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी किनार्‍याला लावल्या आहेत.

-भालचंद्र कोळी, चेअरमन, करंजा मच्छीमार सोसायटी

ढगाळ वातावरणामुळे समुद्रात मासळी मिळत नाही. त्यातच समुद्रात वारंवार येणार्‍या चक्रीवादळांमुळे मासळी स्थलांतरित होते. परिणामी ठरलेल्या ठिकाणी मासळी मिळत नाही.

-अरुण वशेणीकर, मच्छीमार नौका तांडेल