जिल्हाधिकाऱ्यांच्या मनधरणीनंतर पालकमंत्री तटकरेंचा बहिष्कार मागे

जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या आवाहनाला यश

Collector Dr. Success to Kalyankar's appeal
जिल्हाधिकाऱ्यांच्या मनधरणीनंतर पालकमंत्री तटकरेंचा बहिष्कार मागे

गेल्या वर्षभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार टाकलेल्या रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पत्रकार परिषदांना पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात मुहूर्त झाला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी पालकमंत्री तटकरे यांचं अजिबात पटत नव्हतं. यामुळे सुमारे सव्वा वर्षापासून पालकमंत्र्यांच्या बैठका आणि पत्रकार परिषदा या जिल्हाधिकारी कार्यालयात होत नव्हत्या. आता नव्याने आलेले जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्र्यांना विनवणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याविषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी सव्वा वर्षानंतर पहिलीच पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.

माजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या काळात पालकमंत्री आदिती तटकरे यांचे त्यांच्याशी अजिबात जमत नव्हते. ज्येष्ठ अधिकारी असल्याने त्या पालकमंत्र्यांवर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होत्या, असे बोलले जात होते. नियोजन मंडळाच्या एका बैठकीत निधी वाटपावरून पालकमंत्र्यांना चौधरी यांनी आव्हान दिले होते. यामुळे याबैठकीत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यात तुंबळ युध्दच पेटले होते. इतर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत हा वाद तेव्हा मिटवला. मात्र त्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरच बहिष्कार घातला. विविध प्रश्नांशी संबंधित बैठका या पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजत. शिवाय पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त सभागृहात घेतल्या जात. मात्र बहिष्कारामुळे जवळपास सव्वा वर्षं बैठका आणि पत्रकार परिषदा जिल्हाधिकारी कार्यालयात होऊ शकल्या नाहीत.

शासकीय बैठकाही पालकमंत्री तटकरे या एमआयडीसीच्या अतिथीगृहात आयोजत. तिथेच पत्रकार परिषदा घेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालकमंत्री यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे हे द्योतक होते. यानंतर जिल्हाधिकारी चौधरी यांनी पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे श्रेय स्वत:च घेण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील विविध खात्यांच्या कार्यालयांची अवस्था गंभीर बनली होती. या कार्यालयांना रिक्त असलेल्या शासकीय जागा देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी मंत्रालयात आपल्या स्तरावर घेतला. मात्र ते आपणच केल्याचे जिल्हाधिकारी उघडपणे सांगत होत्या. महाड आणि पोलादपूरच्या पूरपरिस्थितीत सरकार या दोन तालुक्यांमध्ये असताना जिल्हाधिकारी चौधरी या सायंकाळी आलिबाग मुख्यालयात येऊन पत्रकार परिषदा घेत. याबाबतही आक्षेप नोंदवला गेला होता.

दोन यंत्रणांतील हा वाद जिल्ह्याच्या विकासाला मारक असल्याचे दिसताच नव्याने आलेले जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पुढाकार घेत पालकमंत्री आदिती तटकरे यांना सन्मानाने जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे आवाहन केले. बुधवारी पार पडलेली पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद ही या वादावर पडलेला पडदा समजला जातो.


हे ही वाचा – सिडको अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे प्रवासी वाहतुकीवर भार