Corona Live Update: १७ मे नंतरही लॉकडाऊन राहणार – पंतप्रधान

coronavirus live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट
१७ मे नंतर पुढच्या लॉकडाऊनचे नियम १८ मेच्या आधी तुम्हाला सांगितले जातील. हा लॉकडाऊन पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा असेल. चौैथ्या लॉकडाऊनसंदर्भात राज्य सरकारांकडून मत मागवलं आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्यापासून येणाऱ्या काही दिवसांत देशाचे अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत पॅकेजबद्दल सविस्तर माहिती देतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनासाठी सरकार जाहीर करत असलेलं पॅकेज स्वावलंबी भारत निर्माणची सुरुवात असेल. महत्त्वाचं पाऊल असेल. कोरोना संकटात सरकारने नुकत्याच ज्या घोषणा केल्या होत्या आणि आज होणारी घोषणा यांना जोडलं, तर हे जवळपास २० लाख कोटींचं पॅकेज आहे. भारताच्या जीडीपीचं हे १० टक्के आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी कच्छ भूकंपाचे ते दिवस बघितले आहेत. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. असं वाटत होतं की कच्छमध्ये सगळीकडे मृत्यूच पसरला होता. त्या परिस्थितीत कुणालाच वाटलं नव्हतं, की कधी परिस्थिती बदलेल. पण ती बदलली. हीच भारतीयांची संकल्पशक्ती आहे. आपण ठरवलं, तर काहीही अशक्य नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाच्या संकटाविरोधात भारताच्या प्रयत्नांचं कौतुक जगभरात होत आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत जेव्हा स्वावलंबित्वाबाबत बोलतो, तेव्हा आत्मकेंद्रीत व्यवस्था अपेक्षित नसते. भारताच्या स्वावलंबित्वामध्ये जगाचं सुख, सहयोग आणि शांतीची अपेक्षा असते. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्मनिर्भर भारत, हाच यावर एकमेव मार्ग आहे. एक देश म्हणून आज आपण एका महत्त्वाच्या ठिकाणी उभे आहोत. हे संकट भारतासाठी एक संधी घेऊन आलं आहे. कोरोनाचं संकट सुरू झालं, तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हतं. एन-९५ मास्क अगदीच कमी उत्पादित होत होते. आज दररोज २ लाख पीपीई आणि २ लाख मास्क बनवले जात आहेत. कारण भारताने संकटाला संधीत रुपांतरीत केलं आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना संकटाच्या नंतर देखील जगात जी परिस्थिती आहे, ती देखील आपण पाहू शकतो. जेव्हा या संकटाकडे भारताच्या दृष्टीने पाहातो, तेव्हा वाटतं की २१वं शतक भारताचं व्हावं, हे आपलं स्वप्नच नाही, तर आपली जबाबदारी देखील आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्याला सतर्क राहून या व्हायरसपासून वाचायचं देखील आहे आणि पुढे देखील जायचं आहे. आज जग संकटात असताना आपल्याला आपला संकल्प अजून मजबूत करावा लागणार आहे. आपला संकल्प या संकटापेक्षाही विराट असेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एका व्हायरसने जगाला त्रासून टाकलं आहे. जगभरात कोट्यवधी लोकं याचा सामना करत आहेत. सगळं जग या युद्धात जुंपलं आहे. आम्ही असं संकट ना कधी पाहिलं आहे ना कधी ऐकलं आहे. मानवजातीसाठी नक्कीच हे सगळं अकल्पनीय आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज दिवसभरात धारावीत कोरोनाचे ४६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९६२वर पोहोचली असून मृतांची संख्या ३१ झाली आहे.

राज्यभरातल्या मद्यप्रेमींसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात कंटेन्मेंट झोन सोडून १४ तारखेपासून घरपोच दारू मिळणार आहे, असा निर्णय राज्य उत्पादन विभागाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे शॉप सुरू करता येणार नाही. रेड झोनमध्ये फक्त कंटेन्मेंट झोन सोडून सेवा देण्यात येणार आहे.


पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सकाळी ९ नंतरपासून पुण्यात ९७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार १०५ रुग्ण झाली आहे.


परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मिशन पहिला टप्पा ७ मे ते १३ मे पर्यंत होता. आता या मिशन दुसरा टप्पा १६ मे ते २२ मेपर्यंत असणार आहे. यादरम्यान ३१ देशांमधील भारतीयांना परत आणले जाणार आहे. फीडर फ्लाइट्ससह १४९ उड्डाणे तैनात करण्यात येणार आहेत.


महाराष्ट्रातील संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, असे असताना देखील अनेक जण संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. अशा व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आता हा आकडा २३ हजार ४०१ जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, या कोरोनावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासन, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तर या सर्वांना ने – आण करण्यासाठी बेस्ट कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाने वेढले आहे. मुंबईसह इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टमधील ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपतो आहे. मात्र, कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर मोदी आज बोलणार आहेत. त्यामुळे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.


स्पेशल ट्रेनसाठी बुकिंग सुरू होताच पहिल्या ३ तासांत ३० हजार तिकिटं बुक झाली आहेत. त्यातून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती आहे.


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेशनिंग कार्ड आधार कार्डशी जोडण्याची मर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्यात चांगलेच हातपाय पसरत असून आता औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काल एका रात्रीत औरंगाबादमध्ये २४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तिथल्या एकूण रुग्णांची संख्या ६५१ झाली आहे.


लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजेच गेल्या दीड महिन्यानंतर आज प्रवासी रेल्वे सुरू झाल्या आहेत. काल म्हणजेच ११ मेपासून रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलं. अवघ्या तासाभरात तिकिट बुकिंग फुल्ल झालं. देशातल्या काही प्रमुख शहरांमधूनच या रेल्वे सध्या सुरू करण्यात आल्या आहेत.


देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७० हजारांच्या वर गेला असून गेल्या २४ तासांत देशात ३६०४ रुग्णांची भर पडली आहे.