Corona Live Update: ग्रीन झोनमधल्या गोव्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

आज कोरोनामुक्त गोव्यात रॅपिड पीसीआर टेस्ट दरम्यान सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्व सात जण मुंबईहून गोव्याला आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसंच त्याचे नमुने गोवा मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.


मुंबईत बुधवारी ८०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५९६वर पोहचला आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी लक्षणीय घट झाली असताना बुधवारी पुन्हा रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबईतील बुधवारी ८०० कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. १० ते ११ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या १९८ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५९६ वर पोहोचली आहे. मृत्यू झालेल्या ४० जणांमधील १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यान झाले आहेत. तसेच २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २४ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय ४० वर्षांखालील, २० जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ५२८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ वर पोहचली आहे. तसेच ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३७९१ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.


राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत राज्यात २५ हजार ९२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसंच आतापर्यंत ५ हजार ५४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी दिलेली माहिती…
  • नाशिकमधील २८ पोलिस हे कोरोनामुक्त झाले आहेत.
  • राज्यात १ हजार २०० कंटेन्मेंट झोन आहेत.
  • मालेगाव आणि औरंगाबादसाठी मायक्रो प्लॅन करण्यात आला आहे.
  • मालेगावातील परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आहे.
  • आतापर्यंत मालेगावातील २५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

इन्कम टॅक्स रिटर्न्समधून पेंडिंग रिफंड्स लवकरच दिले जातील. रिटर्न्स फाईल करण्याची मुदत ३१ जुलै २०२०पासून ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे.


उद्यापासून ३१ मार्च २०२१ पर्यंत टीडीएस आणि टीसीएस दर सध्यापेक्षा २५ टक्क्यांनी घटवण्यात आले आहेत. सर्व प्रकारचे दर किंवा अवेतनीय मोबदले यामध्ये मोजले जातील. यामुळे ५० हजार कोटी रुपये लोकांच्या हातात राहणार आहेत. नाहीतर त्यांनी ते टीडीएस किंवा टीसीएससाठी भरले असते.

गृहनिर्माण विभाग राज्य सरकारांना निर्देश देईल की रजिस्ट्रेशन डेट ६ महिन्यांपर्यंत वाढवली जावी, एक्सपायरी डेट २५ मार्चपासून ६ महिन्यांपर्यंत वाढवण्यात यावी. यासाठी वैयक्तिक अर्ज मागवण्याची आवश्यकता नाही. रेराच्या अंतरर्गत ही तरतूद करण्यात आली आहे.

सध्या देशभरात जे काही कंत्राटदार सरकारी योजनांची कामं करत आहेत, त्या कामांसाठी ३ महिन्यांपासून ६ महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात येऊ शकते. कन्सेशन मुदतीत ३ महिने ते ६ महिन्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो. कंत्राटदाराने जितकं काम पूर्ण केलं असेल, तितकी गॅरंटी त्याला बँकांकडून परत दिली जाईल. जेणेकरून त्याच्याकडे काम करण्यासाठी पैसे राहतील.

वीज उत्पादक आणि वीज वितरण कंपन्यांसाठी ९० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पैसा दिला जाईल.

३० हजार कोटींच्या विशेष निधी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. नॉन बँकिंग वित्तीय क्षेत्रासाठी या निधीची घोषणा करण्यात आली आहे.

सामान्य ईपीएफ खातेधारकांना आणि कंपन्यांना पुढचे तीन महिन्या १२ टक्क्यांऐवजी १० टक्केच हिस्सा भरावा लागेल. पण सरकारी कंपन्यांमध्ये सरकार आणि कर्मचारी १२ टक्केच भरत राहतील. ६७५० कोटींचा फायदा त्यांना होईल.

याआधी कर्मचारी आणि मालक असे दोन्ही १२-१२ टक्के भारत सरकार देणार असं ठरलं होतं. मार्च, एप्रिल, मेसाठी ही योजना होती. ती आता वाढवण्यात आली आहे. ३ लाख ६६ हजार कोटी कंपन्यांमधल्या इपीएफ अकाऊंटमध्ये २.५ हजार कोटी रुपये जून, जुलै, ऑगस्ट या ३ महिन्यांचं इपीएफ कॉन्ट्रिब्युशन म्हणून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळेल.

ई-मार्केटच्या माध्यमातून एमएसएमईचा माल विकण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासोबतच सार्वजनिक केंद्रामध्ये जर एमएसएमईंची काही बिलं अडकली असतील, तर ती येत्या ४५ दिवसांमध्ये क्लिअर केली जातील.

२०० कोटींपर्यंतची सरकारी कंत्राटं भरताना जागतिक स्तरावरची कंत्राटं नसतील. त्यात एमएसएमई फक्त असतील.

एमएसएमई म्हणजे काय? याची व्याख्या आता बदलण्यात आली आहे. गुंतवणूक मर्यादा वाढवण्यात आली आहे. शिवाय उलाढालीची अट देखील एमएसएमई ठरवण्यात आली आहे. उत्पादक आणि सेवा या दोन्ही प्रकारच्या एमएसएमई आता एकच करण्यात आल्या आहेत. सूक्ष्म उद्योगांसाठी आता २५ लाख गुंतवणूकीची मर्यादा १ कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. सूक्ष्म उद्योगांसाठी उलाढालीलीच मर्यादा देखील ५ कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जे सूक्ष्म, मध्यम, लघु, कुटीरोद्योग चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांना विस्तार करायचा आहे, त्यांच्यासाठी फंड्स ऑफ फंड्सची तरतूज करण्यात आली आहे. यासाठी ५० हजार कोटींची तरतूद केली आहे.

जे सूक्ष्म, मध्यम, लघु, कुटीरोद्योग अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी २० हजार कोटींची योजना करण्यात आली आहे. यात २ लाखांहून जास्त उद्योगांना लाभ मिळेल. अशा उद्योगांना हे कर्ज दिलं जाईल.

एमएसएमई क्षेत्रांसाठी ३ लाख कोटींपर्यंतची कर्जयोजना जाहीर. ज्यांची २५ कोटींची कर्ज रक्कम शिल्लक आहे आणि १०० कोटींची उलाढाल आहे, त्यांना याचा फायदा होईल. यामध्ये कुणालाही कोणतंही तारण द्यावं लागणार नाही. पहिल्या वर्षात मुद्दल वसूल केलं जाणार नाही. ४ वर्षांसाठी हे कर्ज दिलं जाईल. ३१ ऑक्टोबर २०२०पर्यंत ही योजना उपलब्ध असेल. त्याचा ४५ लाख अडचणीत नसलेल्या पण सामान्य सूक्ष्म, मध्यम आणि लघु कुटीरोद्योग, घरगुती उद्योगधंद्यांना फायदा होईल. जेणेकरून ते त्यांचा उद्योग जिवंत ठेऊ शकतील. – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

पुढच्या काही दिवसांत पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनोच्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

भिवंडी शहरातील यंत्रमाग व गोडाऊन कामगारांना एसटी महामंडळाच्या ३० मोफत बस मिळाल्याने कामगार वर्ग मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या गावी आज दुपारी तीन वाजता रवाना झाले. या मजूरांना फूड पॉकेज व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले. या बस मधून सुमारे ८१० कामगार रवाना झाले   
labors leaves in bus from bhiwandi

भारतातल्या सर्वात मोठ्या अशा १००० बेडच्या कोविड हॉस्पिटलची उभारणी बीकेसीमध्ये सुरू असून आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कामाची पाहणी केली.


राज्यात सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० तुकड्या तैनात करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे. 


पीपीई किट, मास्क मिळेपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेच्या कंत्राटी कामगारांनी घेतला आहे. ६०० ते ७०० कामगारांनी कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून सुरू केलं कामबंद आंदोलन!


मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये अजूनही ऑनलाई दारूविक्री सुरू नाहीच! जिल्हा प्रशासनाला अद्याप ऑनलाईन दारूविक्री सुरू करण्याचे आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे अजून काही दिवस वाट पाहावी लागणार.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची १ वाजताची नियोजित पत्रकार परिषद आता ४ वाजता होणार आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद झाल्यानंतर या घोषणा जाहीर झाल्यामुळे लगेच शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसू शकणार नाही.


मध्यप्रदेशमध्ये एका जैन मुनींच्या स्वागतासाठी सागर जिल्ह्यातल्या बांदा या ठिकाणी शेकडोंचा जमाव एकत्र आला होता. मंगळवारी हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


देशात कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीवर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तब्बल २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. मात्र, यामध्ये नक्की कोणत्या योजनांचा कोणत्या समाज घटकांसाठी कसा फायदा होईल, याची सविस्तर माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची केलेली घोषणा शेअर बाजारासाठी उत्साह वाढवणारी ठरली आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्सने तब्बल ११०० अंकांची उसळी घेतली आहे. निफ्टी देखील २८० अंकांनी वधारला आहे. लॉकडाऊनमुळे झालेल्या शेअर बाजाराच्या पडझडीनंतरही ही सर्वाधिक उसळी आहे.


गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ३ हजार ५२५ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले असून १२२ लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे देशातल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ७४ हजार २८१वर गेला आहे. यातल्या ४७ हजार ४८० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर २४ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा २४१५ झाला आहे.