कोविड लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल

सिरम इन्स्टिट्यूट कडून ठाणे मंडळासाठी सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

corona vaccine covishield reached Thane district
कोविड लसीचा पहिला साठा ठाणे जिल्ह्यात दाखल

देशभरात लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. देशभरातील राज्यात कोरोना लसीकरणाचे वितरण सुरू झाले आहे. आज सकाळी मुंबईत कोरोना लसीचे १ लाख ३९ हजार डोस दाखल झाले. त्याचबरोबर आता ठाण्यातही कोरोना लसीचा साठा दाखल झाला आहे. कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचा पहिला साठा आज पहाटे ४.३० वा. जिल्ह्यात दाखल झाला आहे. विशेष वाहनाने ही लस ठाण्यात आणण्यात आली. उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे येथे कोरोना लसीचे डोस साठवून ठेवण्यात आले आहेत.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून ठाणे मंडळासाठी सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येणार आहे. उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे हे लसीकरण मोहिमेचे पुढील नियोजन करीत आहेत.

कोरोना लसीचे डोस मुंबई सह आता ठाण्यातही उपलब्ध झाले आहेत. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. ठाण्यातील रूग्णालयात कोरोना लसीकरणाची सगळी तयारी करण्यात आलेली आहे. राज्यात पहिल्या दिवशी ७५ हजार लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. सरकारने कोरोना लसीकरणासाठी तयार केलेल्या कोविन App वर नोंदणी केलेल्यांनाच कोरोनाची लस दिली जाणार आहे. राज्यात एकूण ३५० केंद्रावर कोरोनाचे लसीकरण केले जाणार आहे. कोरोनाची लस सुरक्षित आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – कोरोना लस मुंबईत दाखल, परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक