घरCORONA UPDATEकोरोना विषाणूमुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू

कोरोना विषाणूमुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू

Subscribe

जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा राज्यासह भिवंडीतही मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील महिन्यात २५ जुलै रोजी चौघुले परिवारातील जेष्ठ सदस्य आणि ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महादेव बाबुराव चौघुले (वय ७६) यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अवघ्या २३ दिवसांनी त्यांचे छोटे बंधू पंडित बाबुराव चौघुले (वय ६८) यांचे देखील कोरोनावरील उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले.

या दोन मृत्यूनंतर चौघुले परिवारातील महादेव चौघुले यांच्या पत्नी पार्वतीबाई महादेव चौघुले (वय ७०) यांना देखील कोरोना झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विशेष म्हणजे रविवारी त्या कोरोना मुक्त झाल्या असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र सोमवारी घरी सोडण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

चौघुले परिवारात ४५ सदस्य असून तालुक्यातील एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श उदाहरण म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जाते. या परिवारावर कोरोनाने घाला घातल्याने एकाच महिन्यात तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चौघुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्वतीबाई चौघुले यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित मुली , नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -